जयपूर। राजस्थान येथे सुरू असलेल्या ६७ व्या वरीष्ठ गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत आज चौथ्या दिवशी सकाळ सत्रात उप-उपांत्यपूर्व फेरीचे सामने पार पडले. महाराष्ट्रा पुरुष संघासह भारतीय रेल्वेच्या दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला.
उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या पुरुषांनी मध्य प्रदेशचा ५३-३६ असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. मध्यप्रदेशने आक्रमक सुरुवात करीत महाराष्ट्रावर पहिला लोण देत १४-०४ अशी आघाडी घेतली होती. पण या पिछाडीने खचून न जाता त्वरित महाराष्ट्राने आपला खेळ उंचावत मध्यप्रदेशावर लोण देत ही आघाडी मोडून काढली. पुन्हा दुसरा लोण देत आपल्याकडे आघाडी खेचून आणली.
मध्यांतर झाला तेव्हा २८-२० अशी महाराष्ट्राकडे आघाडी होती. मध्यांतरानंतर आणखी एक लोण देत महाराष्ट्राने विजयावर आपली मजबूत पकड बसविली. शेवटी सावध खेळ करीत कठीण वाटणारा हा विजय सोपा केला. महाराष्ट्राच्या या विजयात अजिंक्य पवार, पंकज मोहिते चढाईत, तर मनोज बोन्द्रे, शुभम शिंदे पकडीत चमकले. अजिंक्यने चढाईत १२, तर पंकजने १० गुण मिळवीत आपली निवड सार्थ ठरविली. मनोज बोन्द्रेला मध्यांतरानंतर संधी मिळूनही त्याने ५ पकडी यशस्वी करीत आपली करामत दाखविली. शुभमने कोपऱ्यातुन, तर संकेत सावंत, स्वप्नील शिंदेने डावा व उजवा मध्य रक्षक म्हणून आपली कामगिरी चोख पार पाडली.
उपउपांत्यपूर्व फेरीचे इतर निकाल.
पुरुष
१) भारतीय रेल्वे 45 विजयी विरुद्ध चंदीगड 35
२) हरियाना 36 विजयी विरुद्ध पौंडदेचेरी 31
३) राजस्थान 53 विजयी विरुद्ध केरळ कोर्ट 33
४) महाराष्ट्र 53 विजयी विरुद्ध मध्यप्रदेश 36
५) कर्नाटक 41 विजयी विरुद्ध हिमाचल 27
६) उत्तरप्रदेश 30 विजयी विरुद्ध तामिळनाडू 28
७) बिहार 51 विजयी विरुद्ध गुजरात 27
८) उत्तरप्रदेश 30 विजयी विरुद्ध तामिळनाडू 28
महिला
१) भारतीय रेल्वे 31विजयी विरुद्ध पंजाब 26
२) गोवा 50 विजयी विरुद्ध चंदीगड 33
३) झारखंड 33 विजयी विरुद्ध उत्तर प्रदेश
४) बिहार 39 विजयी विरुद्ध ओरिसा 10
५) राजस्थान 45 विजयी विरुद्ध आंध्र प्रदेश 24
६) हरियाणा 38 विजयी विरुद्ध दिल्ली 21
७) हिमाचल 41 विजयी विरुद्ध प. बंगाल 20
८) छत्तीसगड 34 विजयी विरुद्ध तामिळनाडू 27.
महत्त्वाच्या बातम्या-
–६७ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत असे होणार बादफेरीचे सामने
–फायनलमध्ये प्रवेश केलेल्या टीम इंडियाची ७ टी२० विश्वचषकातील अशी आहे कामगिरी