जयपूर। राजस्थान येथे सुरू असलेल्या ६७ व्या वरीष्ठ गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र पुरुष संघाने बादफेरीत प्रवेश मिळवला. पुरुष विभागात भारतीय रेल्वे, गुजरात, सेनादल, केरळ (कोर्ट ऑर्डर), महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, हरियाणा, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, पोंडेचेरी, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, बिहार, चंदीगड संघांनी तर महिला गटात भारतीय रेल्वे, तामिळनाडू, हरियाणा, झारखंड, बिहार, आंध्रप्रदेश, हिमाचलप्रदेश, गोवा, पश्चिम बंगाल स्टेट युनिट, चंदीगड, राजस्थान, ओरिसा, दिल्ली, उत्तरप्रदेश, पंजाब व छत्तीसगड संघांनी बादफेरीत प्रवेश केला आहे.
काल स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी झालेल्या साखळी सामन्यानंतर बादफेरीचे चित्र स्पष्ट झाले. महाराष्ट्र पुरुष संघाचा महत्वपूर्ण साखळी सामना हिमाचलप्रदेश विरुद्ध झाला. महाराष्ट्र संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत हिमाचलवर मध्यंतरापर्यत २ लोन पाडले. २२-६ अशा भक्कम आघाडीनंतरही महाराष्ट्र संघाने आक्रमकता कायम ठेवली.
पंकज मोहिते, अजिंक्य पवार यांच्या चढाया तर शुभम शिंदे व रोहित बने यांनी पकडीत उत्कृष्ट खेळ केला. महाराष्ट्र संघाने सांघिक खेळ करत हिमाचलप्रदेश वर ४६-२० असा विजय मिळवला आणि क गटातुन विजयी ठरला. तर हिमाचल गटात दोन विजयासह उपविजयी ठरले.
सेनादल विरुद्ध पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यांत सेनादलने ३४-२२ असा विजय मिळवला. तर केरळ (कोर्ट ड) संघाने ४५-१७ असा विजय मिळवत बादफेरीत प्रवेश केला. ड गटात हरियाणाने ४२-३० असा दिल्लीवर विजय मिळवत बादफेरी गाठली. या गटात तमिळनाडू संघ तीन विजय मिळवत गटातून विजयी ठरले.
महिला गटात हरियाणा संघाने २९-२३ असा झारखंडवर विजय मिळवत गटात दोन सामने जिंकले. हरियाणाने ४ तर झारखंड २ गुणांसह बादफेरीत प्रवेश केला. क गटात बिहारने ६ तर आंध्रप्रदेशने ४ गुणांसह बादफेरीत प्रवेश केला.
उप-उपांत्यपूर्व फेरी सामने पुरुष
१) भारतीय रेल्वे विरुद्ध चंदीगड
२) हरियाणा विरुद्ध पोंडेचेरी
३) राजस्थान विरुद्ध केरला (कोर्ट)
४) मध्यप्रदेश विरुद्ध महाराष्ट्र
५) सेनादल विरुद्ध उत्तरांचल
६) हिमाचल प्रदेश विरुद्ध कर्नाटक
७) बिहार विरुद्ध गुजरात
८) उत्तर प्रदेश विरुद्ध तामिळनाडू
उप-उपांत्यपूर्व फेरी सामने महिला
१) भारतीय रेल्वे विरुद्ध पंजाब
२) गोवा विरुद्ध चंदीगड
३) उत्तरप्रदेश विरुद्ध झारखंड
४) ओरिसा विरुद्ध बिहार
५) हरियाणा विरुद्ध दिल्ली
६) आंध्र विरुद्ध राजस्थान
७) छत्तीसगड विरुद्ध तामिळनाडू
८) वेस्ट बंगाल स्टेट युनिट विरुद्ध हिमाचल प्रदेश