पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) यांच्या वतीने 84व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 22 ते 28 फेब्रुवारी दरम्यान म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण 50 लाख रुपयांची रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. पुरुष आणि महिला एकेरीच्या विजेत्याला अनुक्रमे 3 लाख 25 रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. अशी माहिती पीडीएमबीएचे सचिव रणजीत नातू यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अविनाश जाधव, सारंग लागू, सुधांशू मेडसीकर उपस्थित होते.
डॉ. सायरस पूनावाला आणि वेंकीज यांचे या स्पर्धेला प्रमुख प्रायोजकत्व लाभले आहे. या स्पर्धेत साडेचारशेहून अधिक खेळाडूंचा सहभाग असणार आहे. यात देशातील अव्वल खेळाडू आपले कौशल्य दाखविणार आहेत. यातील पुरुष आणि महिला एकेरीतील खेळाडूंना समान बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे. एकेरीतील विजेत्याला 3 लाख 25 हजार रुपये, तर उपविजेत्याला 1 लाख 70 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या खेळाडूला 1 लाख 25 हजार रुपये, मिळणार आहेत. पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीतील जोड्यांना समान बक्षीस रक्कम दिली जाणार आहे. यातील दुहेरीतील विजेत्यास 3 लाख 45 हजार रुपये, उपविजेत्या जोडीस 1 लाख 70 हजार रुपये दिले जाणार आहे. उपांत्य फेरीतील विजेत्यास 1 लाख 22 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
सांघिक विजेत्यांना एकूण दहा लाख रुपयांची पारितोषिक रक्कम दिली जाणार आहे. यातील विजेत्या संघास पाच लाख रुपयांचे पारितोषिक आहे, तर उपविजेत्या संघाला अडीच लाख रुपयांचे पारितोषिक आहे. तिसऱ्या क्रमांकावरील संघांस प्रत्येकी एक लाख 25 हजार रुपये पारितोषिक रक्कम दिली जाणार आहे.
रणजीत नातु म्हणाले, पुरुष एकेरीतील विजेत्याला दाजीसाहेब नातू करंडक, महिला एकेरीतील विजेत्याला अविनाश वारदेकर करंडक, पुरुष दुहेरीतील विजेत्यास भाऊसाहेब मेहेंदळे करंडक, महिला दुहेरीतील विजेत्यास प्रिन्सिपल एन. जी. सुरू करंडक, मिश्र दुहेरीतील विजेत्यास मकरंद भावे करंडक देऊन गौरविण्यात येणार आहे. अविनाश वारदेकर 40 वर्षे पीडीएमबीएचे अध्यक्ष होते. त्यांनी पीडीएमबीएच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून चषकाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. उपविजेत्यांनाही आकर्षक करंडक देण्यात येणार आहे. विजेत्यांसाठी तयार करण्यात आलेल्या चषकात चांदीचे शटल असतील. आम्ही हे करंडक विशेष लक्ष देऊन विशिष्ट डिझाइनचा वापर करून तयार करून घेतले आहेत. ज्यामुळे हे करंडक स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरणार आहेत. दाजीसाहेब नातू बॅडमिंटन प्रमोशन फाउंडेशनकडून हे सर्व करंडक दिले जाणार आहेत, असेही नातु यांनी सांगितले.
वैद्यकीय सुविधा
स्पर्धेदरम्यान खेळाडूंसाठी 30 फिजिओ उपलब्ध असणार आहे. त्यांना चार वरिष्ठ फिजिओ मार्गदर्शन करतील. स्पर्धेच्या ठिकाणी 24 तास सर्व सुविधांनी सुसज्ज रुग्णवाहिका असणार आहे. खेळाडूंसाठी स्टेडियममध्येच सहा बेडचे मेडिकल सेटअप असेल. यात दोन डॉक्टर आणि दोन नर्स चोवीस तास उपलब्ध असतील. यात सर्व अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतील. काही वैद्यकीय आपातकालीन स्थितीत ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दोन खोल्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी डॉ. अतुल बिनिवाले आणि डॉ. अनंता भूषण रानडे या वरिष्ठ फिजिशियनचे मार्गदर्शन असणार आहे. अनेक वेळा आंतरराष्ट्रीय स्तराच्या स्पर्धेसाठी अशा सुविधा उपलब्ध नसतात. मात्र, खेळाडूंची वैद्यकीय गरज लक्षात घेऊन या वेळी प्रथमच याकडे विशेष लक्ष पूरविण्यात आले आहे.
गेल्या वर्षी भारताने थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या 74 वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारताने ही कामगिरी केली. याची दखल घेत स्पर्धेच्या 74 वर्षांच्या काळात महाराष्ट्रातले जे पुरुष खेळाडू थॉमस कपसाठी खेळले त्या 17 खेळाडूंचा सन्मान प्रकाश पदुकोण यांच्या हस्ते होणार आहे. अशा खेळाडूंना ताम्रपत्र, पुणेरी पगडी देऊन गौरविण्यात येणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी संचलन होणार आहे, या वेळी ई-ज्योत प्रज्ज्वलित करण्यात येणार आहे.
स्पर्धेत पीवायी हिंदू जिमखाना 1930 आणि लक्ष्मी क्रीडा मंदिर 1950 असे दोन स्टँड उभारण्यात येणार आहेत. यानिमित्ताने पुण्यातील पहिल्या 2 बॅडमिंटन कोर्टच्या स्मृती जागविण्यात येणार आहेत. (84th Yonex Sunrise Senior National Badminton Tournament check out prize money)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऐतिहासिक! भारतीय बॅडमिंटन संघाने रचला इतिहास, पहिल्यांदाच जिंकले मानाच्या स्पर्धेत पदक
पीव्ही सिंधू झळकली फोर्ब्सच्या यादीत, सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ‘या’ स्थानावर