भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याला सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील भारतीय कसोटी संघात संधी मिळाली होती. परंतु आयपीएल २०२० दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे त्याचे स्थान संभ्रमात होते. अखेर कसोटी मालिकेची सुरुवात होण्यापुर्वी त्याला संघातून वगळण्यात आले. १७ डिसेंबरपासून ऍडलेड येथे दिवस-रात्र कसोटी सामन्याने मालिकेची सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी प्रसिद्ध क्रिकेट समालोचक संजय मांजरेकर यांनी इशांतच्या अनुपस्थितीविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
सोनी स्पोर्ट्सशी बोलताना मांजरेकर म्हणाले की, “भारतीय कसोटी संघाला इशांतची खूप उणीव भासणार आहे. कारण इशांत कसोटी संघाच्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक होता. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे सध्याच्या भारतीय कसोटी संघातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहेत. यांच्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा सामना करण्यासाठी संघाला ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांची गरज होती. इशांतने ही जागा भरुन काढली असती.”
इशांत शर्माविषयी स्टिव्ह स्मिथने केले होते वक्तव्य
मांजरेकर यांच्यापूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथने इशांतला कसोटी संघातून वगळण्यात आल्यामुळे वक्तव्य केले होते. स्मिथ म्हणाला होता की, “तीन सर्वोत्कृष्ट गोलंदाजांमध्ये इशांत नसल्यामुळे भारतीय कसोटी संघाला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. अर्थातच इशांत कसोटी संघातून बाहेर झाल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला खूप फायदा होणार आहे.”
यापूर्वी जेव्हा भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळली होती. तेव्हा भारतीय गोलंदाजांनी एकूण ७० विकेट्स घेतल्या होत्या. यात बुमराह सर्वाधिक २१ विकेट्ससह पहिल्या क्रमांकावर होता, तर शमीने १६ विकेट्स आणि इशांतने ११ विकेट्स घेतल्या होत्या.
इशांतची कसोटी क्रिकेटमधील आकडेवारी
इशांतच्या आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीविषयी बोलायचे झाले, तर फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याने शेवटचा कसोटी सामना खेळला होता. तेव्हापासून त्याला कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली नाही. इशांतने आतापर्यंत एकूण ९७ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने २९७ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याच्या ७४ धावांवर ७ विकेट्स घेण्याच्या सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरीचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अष्टपैलू कैमरुन ग्रीन भारताविरुद्ध खेळण्याची शक्यता, ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने दिले संकेत
युवा खेळाडूंना आयपीएल लिलावापूर्वी मिळणार व्यासपीठ, मुश्ताक अली टी२० स्पर्धेच्या तारखा जाहीर
“कसोटी मालिका नशिबाने जिंकता येत नाहीत”; ‘या’ खेळाडूने सुनावले टीकाकारांना खडे बोल