सध्या संयुक्त अरब अमिराती ( युएई ) येथे इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १४ वा हंगाम खेळला जात आहे. सध्या स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असताना, स्पर्धेतील सर्व खेळाडूंना एक सुखद धक्का दिला गेला आहे. दरवर्षी आयपीएलमध्ये खेळाडूंची होणारी उत्तेजक चाचणी म्हणजेच डोपिंग टेस्ट यावर्षी करण्यात येणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या वर्षी खेळाडूंना या चाचणीतून सूट देण्याचा निर्णय घेतला.
बीसीसीआयने नाही दिली परवानगी
बीसीसीआयने यावर्षी युएईमध्ये स्पर्धेच्या उत्तरार्धासाठी तयार केलेल्या बायो बबलमध्ये राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सीच्या (नाडा) अधिकाऱ्यांना येण्यास प्रतिबंध केला आहे. अधिकाऱ्यांना बायो बबलमध्ये प्रवेश न दिला गेल्याने खेळाडूंच्या उत्तेजक द्रव्य चाचण्या होणार नाहीत. खेळाडूंच्या आरोग्याला प्राधान्य देत हा निर्णय घेतल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांकडून समजले आहे.
पहिल्या टप्प्यात ही झाल्या कमी चाचण्या
आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यातही कोरोनामुळे डोप टेस्ट कमी झाल्या होत्या. मात्र, नाडाच्या डीसीओ (डोपिंग कंट्रोल ऑफिसर) ला कोरोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयने चाचण्या पूर्णपणे बंद केल्या होत्या. बीसीसीआयने सुरुवातीला मुंबई, चेन्नई आणि दिल्ली येथे तीन डीसीएस (डोप कंट्रोल स्टेशन) ला परवानगी दिली होती. आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात डीसीओला बायो बबलमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली होती. परंतु, नाडाचे डोप कंट्रोल ऑफिसर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर इतरांना बायो बबलमध्ये प्रवेश बंदी करण्यात बंदी घातली गेली.
मागील वर्षी झालेल्या होत्या अनेक चाचण्या
या वर्षी प्रमाणे मागील वर्षी देखील आयपीएलचा 1
१३ वा हंगाम युएईमध्येच खेळला गेला होता. त्यावेळी, नाडाचे अधिकारी पहिल्यापासून बायो बबलचा भाग होते. गतवर्षी नाडाने दिलेल्या माहितीनुसार, ४० खेळाडूंची डोपिंग टेस्ट करण्यात आलेली. सुदैवाने, तेव्हा एकही खेळाडू चाचणीत दोषी ठरला नव्हता.