माऊंट मॉनगनुई| भारताने बे स्टेडियमवर आज (26 जानेवारी) झालेल्या दुसऱ्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडवर 90 धावांनी विजय मिळवला आहे. यामुळे भारताने 5 सामन्यांच्या वन-डे मालिकेत 2-0ने आघाडी मिळवली आहे.
न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच नेतृत्व करताना पहिल्या दोन वनडे सामन्यात विजय मिळवणारा विराट कोहली हा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली 23 जानेवारीला झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने 8 विकेट्सने विजय मिळवला होता.
याआधी भारतीय संघाने 2008-09 मध्ये न्यूझीलंड येथे एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली 5 सामन्यांची वन-डे मालिका 3-1 अशी जिंकली होती. यातील पहिला सामना डकवर्थ लुईसच्या नियमानुसार 53 धावांनी जिंकला होता तर दुसऱ्या सामन्याचा निकाल लागला नव्हता.
आजच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकताना प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडसमोर 325 धावांचे लक्ष ठेवले होते. यात सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी अनुक्रमे 87 आणि 66 धावांची खेळी केली होती. यावेळी विराटने 5 चौकाराच्या मदतीने 45 चेंडूत 43 धावा केल्या. तसेच अंबाती रायडूने 47 धावा आणि यष्टीरक्षक एमएस धोनीने नाबाद 48 धावा केल्या होत्या.
भारतीय गोलंदाजांमध्ये कुलदिप यादवने 45 धावा देत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 2, मोहम्मद शमी आणि केदार जाधव या दोघांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
–प्रजासत्ताक दिनी अर्धशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माचा अनोखा पराक्रम
–स्टम्पिंगचा बादशहा एमएस धोनीची चपळाई पाहून फलंदाजही झाला चकीत, पहा व्हिडिओ
–ये जोडी हैं नंबर 1- हिटमॅन-गब्बर जोडीने मोडला सेहवाग- सचिन जोडीचा विक्रम