भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेचा तिसरा सामना भारताने दुसऱ्याच दिवशी १० गडी राखून जिंकला. पुर्नबांधणी करण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (मोटेरा स्टेडियम) झालेल्या या सामन्यात विजय मिळवत भारताने ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. हा सामना दोनच दिवसात संपल्याने सामन्यासाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीवर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी टिका केली. मात्र, भारतीय कर्णधार विराट कोहली व रोहित शर्मा यांनी खेळपट्टीचे कौतुक केल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूटने त्यांना चांगलेच सुनावले आहे.
भारताने मिळवला दोन दिवसात विजय
नव्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने दोन दिवसाच्या आतच विजय मिळविला. भारत आणि इंग्लंड दोन्ही संघांचे फलंदाज खेळपट्टीवर अपयशी ठरले. दोन्ही संघांचे मिळून ३० फलंदाज या सामन्यात बाद झाले, त्यापैकी २८ बळी हे फिरकीपटूंनी घेतले. या खेळपट्टीवर अनेक माजी खेळाडूंकडून टीका होत आहे.
जो रूटने दिली प्रतिक्रिया
अनेक माजी क्रिकेटपटू खेळपट्टीवर टिका करत असताना भारतीय कर्णधार विराट कोहली आणि वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा यांनी खेळपट्टीचे कौतुक केले होते.
त्यावर प्रतिक्रिया देताना इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूटने म्हटले आहे की, “ही खेळपट्टी अत्यंत आव्हानात्मक होती. फलंदाजांना फलंदाजी करणे अवघड जात होते. मात्र, एक खेळाडू म्हणून आपल्याला विविध परिस्थितीत निभावत लावता आला पाहिजे. ही खेळपट्टी खेळासाठी उपयुक्त होती की नाही हे खेळाडू नव्हे तर आयसीसी ठरवेल. आयसीसीला यापुढे कसोटी क्रिकेटला अनुकूल खेळपट्टीवर बनवण्यासाठी विचार करावा लागेल.”
विराट-रोहितने केले होते खेळपट्टीचे कौतुक
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व रोहित शर्मा यांनी अहमदाबाद कसोटीसाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीचे कौतुक केले होते. त्यांनी म्हटले होते की, खेळपट्टी चांगली होती मात्र फलंदाजीचा तर तितकासा चांगला नव्हता. अशा खेळपट्टीवर तुम्हाला धावा काढण्याची इच्छाशक्ती हवी असते.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsENG: गोलंदाजीने इंग्लिश फलंदाजांच्या आणली नाकी नऊ, ठरला सामनावीर; तरीही का निराश आहे अक्षर?
यजमानांपुढे पाहुणे २ दिवसांत चित; ‘ही’ आहेत इंग्लंडच्या पराभवाची तीन प्रमुख कारणे