टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा समारोप रविवारी (८ ऑगस्ट ) झाला. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ७ पदकं जिंकून भारतीयांची मान उंचावली. यापूर्वी लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ६ पदक जिंकले होते. खेळाडू मैदानावर आपली सर्वोत्तम कामगिरी करून पदक मिळवत असतात. परंतु, यामागे त्यांचे प्रशिक्षक देखील प्रचंड मेहनत घेत असतात. चला तर जाणून घेऊया, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पदक मिळवून देणाऱ्या खेळाडूंच्या प्रशिक्षकांबद्दल.
उवे होन (मुख्य प्रशिक्षक) आणि क्लाउस बार्टोनिट्ज
देश : जर्मनी
खेळाडू : नीरज चोप्रा
खेळ: भालाफेक
पदक : सुवर्ण पदक
भारतीय खेळाडू नीरज चोप्राने भालाफेक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक मिळवून भारतीय संघाला टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. हे यश मिळवण्यामागे क्लाउस बार्टोनिट्ज यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी नीरज चोप्राला मजबूत बनवण्यात महत्वाचे योगदान दिले आहे.
तसेच १०० मीटर पेक्षाही अधिक भाला फेकणाऱ्या एकमात्र खेळाडू उवे होन यांनी सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राला प्रशिक्षण दिले आहे. या दोन्ही प्रशिक्षकांनी चिनी राष्ट्रीय संघासोबत काम केले होते. गेल्या ३ वर्षांपासून नीरजला भालाफेक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकाचा प्रबळ दावेदार मानले जात होते. त्याने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर भाला फेकून सुवर्ण पदक पटकावले.
विजय शर्मा (मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक)
देश : भारत
खेळाडू : मीराबाई चानु
खेळ : वेटलिफ्टींग – ४९ कीलोग्राम
पदक : रौप्य पदक
मीराबाई चानुला माजी राष्ट्रीय खेळाडू विजय शर्मा यांनी मार्गदर्शन केले. मीराबाई चानुला रियो ऑलिम्पिक स्पर्धेत एकही पदक मिळवण्यात यश आले नव्हते. परंतु, त्यानंतर विजय शर्मा यांनी मीराबाई चानुचा आणखी जोरदार सराव करून घेतला. पाच वर्षांपूर्वी केलेली निराशाजनक कामगिरी विसरून तिने नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक मिळवून वेटलिफ्टिंगमध्ये पदकाच्या २१ वर्षांच्या प्रतिक्षेला अखेर पूर्णविराम लावला आहे.
कमाल मलिकोव
देश : रुस
खेळाडू : रवी दहिया
खेळ : फ्रीस्टाईल कुस्ती – ५७ किलोग्राम
सुशील कुमारची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तयारी करून घेण्यासाठी कमाल मलिकोव यांची नियुक्ती करण्यात आली होती.परंतु, सुशीलला अटक झाल्याने हे आता अशक्य होते. त्यामुळे रवी दहियाचा सराव करून घेण्यासाठी त्यांना नियुक्त करण्यात आले होते. रवी दहियाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ५७ किलोग्राम फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात रौप्य पदक जिंकून भारतीयांची मान उंचावली.
शाको बेंटीनिडीस
देश : जॉर्जिया
खेळाडू : बजरंग पुनिया
खेळ : ६५ किलोग्राम फ्रीस्टाईल कुस्ती
पदक : कांस्य पदक
शाको बेंटीनिडीस यांनी ६५ किलोग्राम फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात बजरंग पूनियाला घडवण्यात मोलाचे योगदान दिले आहे. हरियाणाच्या बजरंग पूनियाला सुवर्ण पदक मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु, उपांत्यफेरीच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर त्याचे सुवर्ण पदक मिळवण्याचे स्वप्नं तुटले होते. त्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
राफेल बर्गमास्को (हाय परफॉर्मन्स डायरेक्टर)
देश :इटली
खेळाडू : लवलीना बोरगोहेन
खेळ : महिला बॉक्सिंग
पदक : कांस्यपदक
राफेल बर्गमास्को यांनी ५ वेळेस राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत जेतेपद पटकावले आहे. त्यांनी बीजिंग, लंडन आणि रियो ऑलिम्पिक स्पर्धेत प्रशिक्षक म्हणून सहभाग घेतला आहे. २०१७ मध्ये ते भारतीय संघासोबत जोडले गेले. त्यानंतर त्यांची वरिष्ठ महिला संघाच्या हाय परफॉर्मन्स डायरेक्टरपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लवलीना हीने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. यासह ती मेरी कॉम आणि विजेंदर सिंगनंतर पदक मिळवणारी तिसरी बॉक्सर ठरली.
पार्क ताय – सांग
देश : दक्षिण कोरिया
खेळाडू : पीव्ही सिंधू
खेळ : बॅडमिंटन
पदक : कांस्यपदक
पीव्ही सिंधूने पार्क ताय – सांग यांच्या मार्गदर्शनाखाली टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवले. पार्क ताय – सांग यांनी २००४ मध्ये झालेल्या आशिया क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक मिळवले होते. २०१९ मध्ये किम जी ह्यून यांनी व्यक्तिगत कारणास्तव माघार घेतल्यानंतर पार्क ताय – सांग यांनी पीव्ही सिंधूला प्रशिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारली होती. पीवी सिंधूने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले.
ग्रॅहम रीड
देश : ऑस्ट्रेलिया
संघ : भारतीय पुरुष हॉकी संघ
पदक : कांस्य पदक
भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीला पराभूत करत तब्बल ४१ वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्पदक मिळवले. भारतीय पुरुष संघाला पदक मिळवून देण्यात ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. ग्रॅहम रीड यांनी बार्सीलोना ऑलिम्पिक १९९२ स्पर्धेत रौप्य पदक मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी २०१९ मध्ये भारतीय संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
“जो रुट नाही, तर बुमराहलाच पहिल्या कसोटीचा सामनावीर पुरस्कार मिळायला हवा होता”
पहिला कसोटी अनिर्णीत सुटला, पण विराट आणि रहाणेच्या चिंतेत झाली वाढ; ‘हे’ आहे प्रमुख कारण