दीर्घकाळ क्रिकेटमध्ये यश मिळवण्यासाठी इतर खेळातील खेळाडूंप्रमाणेच क्रिकेटपटूंनाही खूप शिस्त लावावी लागते. चांगली कामगिरी करूनही, जर एखादा खेळाडू शिस्तबद्धता कायम ठेवत नसेल तर, त्यांची यशस्वी क्रिकेट कारकीर्द बहुतेक लवकरच संपते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी काही मोठी उदाहरणे आहेत ज्यात मद्यपान करण्याच्या चुकीच्या सवयीमुळे काही क्रिकेटपटूंना त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत प्रचंड त्रास सहन करावा लागला.
जाणून घेऊया अशा पाच प्रसिद्ध क्रिकेटपटूंबद्दल, ज्यांना मद्यपान करण्याच्या वाईट सवयीमुळे त्रास सहन करावा लागला.
१. रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting)
ऑस्ट्रेलियासाठी दोन वेळा विश्वचषक जिंकून देणारा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग हा एक महान खेळाडू आहे. परंतु एकदा त्याला मद्यपानामुळे निलंबनास सामोरे जावे लागले होते.जानेवारी १९९९ मध्ये ही घटना घडली.
ऑस्ट्रेलिया संघ जेव्हा वनडे तिरंगी मालिके (सीयूबी मालिका १९९८/९९) मध्ये सहभागी झाला होता. तेव्हा पॉन्टिंग किंग्ज क्रॉस (न्यू साउथ वेल्स) मधील पब बाहेरच्या एका भांडणात सहभागी होता. त्यावेळी त्याच्या डाव्या डोळ्याला दुखापतही झाली होती. नंतर, त्याला तीन सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते.
पॉन्टिंग यानेही कबूल केले की त्याने मद्यपान केले होते. पण नंतर त्याच्या कारकिर्दीवर या गोष्टीचा जास्त परिणाम झाला नाही. त्याने त्याच्या कारकिर्दीत खुप यश संपादन केलं.
२. जेसी रायडर (Jesse Ryder)
जेसी रायडर हा न्यूझीलंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघातील महत्वाच्या सदस्यांपैकी एक अष्टपैलू खेळाडू होता. परंतु त्यांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे त्याने अगदी लहान वयातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रवास संपुष्टात आणला आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे मद्यपान करण्याची सवय ही होती.
आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत रायडरला त्याच्या वागणुकीसाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागला आणि बहुतेक वेळा त्याचे मोठे कारण म्हणजे मद्यपान होते. पण न्यूझीलंडच्या संघर्षमय काळात त्याच्या फारच चांगल्या फॉर्ममुळे न्यूझीलंड क्रिकेट (एनझेडसी) चे मुख्य कार्यकारी अधिकारी जस्टीन वॉन या क्रिकेटपटूला पिण्याच्या समस्येपासून मुक्त करण्यासाठी मदत करण्यास तयार झाले होते.
परंतू मार्च २०१३ मध्ये रायडर मोठ्या जीवघेण्या घटनेत सामील झाला. ज्यामुळे त्याचे क्रिकेटपटू म्हणून संपूर्ण आयुष्य बदलले. मेरिवाले (क्राइस्टचर्च) मधील बारच्या बाहेर त्याच्यावर हल्ला करण्यात आला ज्याने त्याच्या कवटीला जबरदस्त मार बसला आणि त्याच्या फुफ्फुसांना देखील त्रास झाला. नंतर असे कळले की रायडरला कोमातून बाहेर येण्यासाठी ५६ तास लागले.
रायडरने डिसेंबर २०१३ मध्ये पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि काही सुरुवातीच्या सामन्यांमध्ये प्रभावी खेळ केला पण तरी तो फारसा टिकू शकला नाही.
३. अँड्र्यू सायमंड्स (Andrew Symonds)
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स क्रिकेट विश्वातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जात होता. परंतु, त्याची मद्यपान करण्याची सवय आणि सतत नियमांचे उल्लंघन करण्यामुळे त्याच्या क्रिकेट कारकीर्दीत नेहमीच अडथळे येत होते.
त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत (१९९८-२००९) सायमंड्सने बर्याच वादाचा सामना केला. या अष्टपैलू खेळाडूलाही त्याच्या गैरवर्तनांमुळे शिक्षा झाली.
२००८ मध्ये ऑस्ट्रेलिया भारत दौर्यादरम्यान सायमंड्सने पबच्या भांडणात भाग घेतल्याची म्हटले जाते. २००९ मध्ये इंग्लंडमधील टी२० विश्वचषकादरम्यानही सायमंड्सला दारुशी संबंधित आणखी एका घटनेत सहभागी झाल्यामुळे त्याला घरी पाठविण्यात आले होते. यानंतर काही दिवसातच त्याने निवृत्ती घेतली. वयाच्या ४६व्या वर्षी १४ मे २०२२ रोजी एका कार अपघातात त्याचा मृत्यू झाला.
४. बेन स्टोक्स (Ben Stokes)
इंग्लंडचा क्रिकेटपटू बेन स्टोक्स हा सध्याच्या क्रिकेट जगातील एक महान अष्टपैलू खेळाडू आहे. परंतू सध्याचा सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टोक्सला त्याच्या मद्यपानाच्या सवयीमुळे एकदा मोठा फटका बसला आहे.
सप्टेंबर २०१७ मध्ये, स्टोक्स, त्याचा संघ सहकारी एलेक्स हेल्स बरोबर नाईटक्लबच्या बाहेर दोन माणसांसह रस्त्यावर भांडण करताना आढळला होता. त्या भांडणात सामील झाल्यानंतर स्टोक्सच्या हाताला दुखापतही झाली होती. त्या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. या प्रकरणात स्टोक्सला अटकही झाली होती. त्या घटनेची चौकशी जवळपास वर्षभर चालली.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) स्टोक्स आणि हेल्सला खेळ बदनाम करण्यासाठी जबाबदार धरले. स्टोक्सने या आरोपास दोषी ठरविले, तर ईसीबीने त्याला आठ सामन्यांसाठी निलंबित केले आणि £ 30,000 एवढा दंडही आकारला.
पण निलंबन संपल्यानंतर स्टोक्सने जोरदार खेळात पुनरागमन केले आणि २०१९ चा विश्वचषक इंग्लंडला जिंकून देण्यात मोठा वाटा उचलला. तसेच २०१९ अॅशेस मालिकेत इंग्लंडला पराभूत होण्यापासूनही वाचवले.
५. डेव्हिड वॉर्नर (David Warner)
ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा डावखुरा स्पोटक फलंदाज म्हणून नावारूपाला आला आहे. पण तो त्याच्या कारकिर्दीत अनेक वेळा वादांमध्येही सापडला होता. त्यालाही मद्यपान करण्याची वाईट सवय आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ मध्ये इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना संपल्यानंतर, जेव्हा दोन्ही संघातील खेळाडू बर्मिंघम येथे ऑस्ट्रेलियन-थीम असलेल्या बारमध्ये होते, तेव्हा वॉर्नरने इंग्लिश क्रिकेटपटू जो रूट याला मारहाण केली होती. परिणामी, वॉर्नरला उर्वरित स्पर्धा आणि इंग्लंडमधील अॅशेस २०१३ च्या सुरुवातीच्या सामन्यातून निलंबित करण्यात आले.
या प्रकरणानंतर त्याने रूटची माफीही मागितली असा दावाही करण्यात आला होता. नंतर वॉर्नरने हेही उघड केले की जून २०१५ ते मे २०१७ या काळात त्याने दारूच्या एका थेंबालाही स्पर्श केला नाही.
वाचनीय लेख –
वनडे, टी२०क्रिकेट गाजवलेले पण कसोटी क्रिकेट नशिबात नसलेले ४ क्रिकेटर