क्रीडाजगतातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला होता. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघावर आंतकवादी हल्ला करण्याची धमकी दिली होती. त्या पाकिस्तानी व्यक्तीला आता पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील पोलिसांनी अटक केली आहे. (Pakistan police arrest man for threatening to conduct terror attack on Australian cricket team)
या महिन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तान दौरा आटोपला होता. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघात ३ कसोटी, ३ वनडे आणि १ आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला गेला. यादरम्यान मिळालेल्या धमकीनंतर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी तपास सुरू केला होता.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “गुरुवारी (दि. १४ एप्रिल) पोलिसांनी त्या व्यक्तीला शोधले, ज्याने ऑस्ट्रेलियाच्या गृहमंत्रालयाला आंतकवादी हल्ला करण्याची धमकी दिली होती. त्याला अटक करण्यात आलीये.” यावेळी त्यांनी असेही सांगितले की, धमकी देणारा आरोपी इरफान नासिरला लाहोरपासून २०० किमी दूर असणाऱ्या तोबा टेक सिंग येथून अटक करण्यात आलीये.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
“त्याच्याविरुद्ध दहशतवादविरोधी कायदा आणि टेलिग्राफ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” असेही पुढे बोलताना ते म्हणाले. पोलिस आणि गुप्तचर संस्थेने त्याच्या मोबाइल फोन डेटावरून संशयिताचा शोध घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या दौऱ्यात कसोटी संघाचा भाग असलेला ऑस्ट्रेलियन फिरकीपटू ऍश्टन एगर यालाही सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.