वेगवान गोलंदाजांची फॅक्टरी म्हणून पाकिस्तानला ओळखले जाते. इम्रान खान यांच्यापासून सुरू झालेली दर्जेदार वेगवान गोलंदाजांची परंपरा आज शाहिन आफ्रिदी, नसीम शाह यांच्यापर्यंत अबाधित आहे. मधल्या काळात वकार-वसिम, अख्तर, मोहम्मद आसिफ, मोहम्मद आमिर यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजीचे नेतृत्व केले. असाच एक दर्जेदार वेगवान गोलंदाज पाकिस्तानसाठी खेळून गेला, तो म्हणजे आकीब जावेद.
५ ऑगस्ट १९७२ रोजी लाहोर मध्ये आकीबचा जन्म झाला. वयाच्या ७ व्या वर्षी आकीब पहिल्यांदा क्रिकेट मैदानावर गोलंदाजी करण्यासाठी उतरला. त्याची गोलंदाजी पाहून वयाच्या १२ व्या वर्षी आकीबला प्रथमश्रेणी सामना खेळायची संधी मिळाली. लाहोर डिव्हिजन संघाकडून खेळताना त्याने पहिल्याच सामन्यात तीन बळी मिळविले. ज्यावेळी, आकीबला मित्रांनी विचारले की,
“पहिल्या प्रथमश्रेणी सामन्याचा अनुभव कसा होता?”
तेव्हा त्याने उत्तर दिले,
“तो प्रथमश्रेणी सामना होता? मला वाटले सहज खेळायला बोलवले होते.”
आकीबमधील नैसर्गिक प्रतिभा सर्वप्रथम पाकिस्तानचे माजी दिग्गज खेळाडू वसीम रझा यांनी ओळखली. १९ वर्षाखालील क्रिकेट संघाच्या निवडीसाठी लाहोरमध्ये एक कॅम्प लागला होता. आकीब सुद्धा त्या कॅम्पमध्ये दाखल झाला. ज्या वेळी त्याच्या ट्रायलची वेळ आली तेव्हा त्याला अवघे दोन चेंडू टाकायला मिळाले. तो रझा यांना खुश करू शकला नाही. त्यानंतर, तो बाजूला बसून इतर गोलंदाजांची गोलंदाजी पाहत होता. काही वेळाने त्याला असे वाटले की, आपण या बाकीच्या गोलंदाजापेक्षा चांगली गोलंदाजी करू शकतो. तो पुन्हा रझा यांच्याकडे गेला व अजून एक संधी देणे विषयी बोलला. रझा यांनी थोडी नानुकूर करून त्याला अधिक पसंती दिली. यावेळी मात्र, आकीबने जिवाच्या आकांताने गोलंदाजी करत रझा यांना खूष केले. पुढे, रझा यांनी त्याची निवड १९८८ युवा विश्वचषक संघात केली.
कर्णधार इम्रान खान यांनी आकीबचा समावेश भारत दौऱ्यावर जाणाऱ्या संघात केला. पाकिस्तान संघाचे खेळाडू लाहोर विमानतळावर जमा झालेले कसताना, १६ वर्षाचा आकीबसुद्धा तिथे हजर होता. पाकिस्तानचा वरिष्ठ खेळाडू रमिझ राजा याला वाटले, हा मुलगा चाहता दिसतोय म्हणून तो आकीबला स्वाक्षरी देऊ लागला पण आकीब काहीच बोलला नाही. इतक्यात तिथे कर्णधार इम्रान खान आले. त्यांनी सर्व खेळाडूंशी आकीबची ओळख करून दिली. आजही राजा यांना ही गोष्ट सांगताना हसू आवरत नाही.
आकीब १६ वर्ष १८९ दिवस इतक्या वयाचा असताना प्रथम पाकिस्तान साठी खेळला. सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा तिसरा खेळाडू होण्याचा मान त्याच्याकडे जातो. त्याने न्यूझीलंड विरुद्ध आपल्या कसोटी कारकीर्दीची सुरुवात केली. दोन महिन्यानंतर वेस्ट इंडीजविरुद्ध त्याने वनडेमध्ये पदार्पण केले. त्याचा पहिला वनडे बळी वेस्ट इंडीजचे महान खेळाडू रीची रीचर्डसन हे होते.
ऑक्टोबर १९९१ मध्ये आकीबने एक कारनामा केला. अवघे १९ वय असताना वनडे क्रिकेटमध्ये त्याने हॅट्रिक घेतली. शारजामध्ये भारताविरुद्ध रवी शास्त्री, मोहम्मद अजहरुद्दिन व सचिन तेंडुलकर यांना बाद करत त्याने ती हॅट्रिक पूर्ण केली होती. त्याच सामन्यात आकीबने ३७ धावा देऊन भारताचे ७ गडी गारद केले.
१९९२ चा विश्वचषक त्याच्यासाठी स्वप्नवत राहिला. कर्णधार इम्रान खान यांचा विश्वास सार्थ ठरवत, आकीबने पाकिस्तानला विश्वविजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा हातभार लावला. आकीबने विश्वचषकात ११ बळी मिळवले. त्याने जखमी वकार युनूसची उणीव भरून काढली होती. अंतिम सामन्यात फक्त २७ धावा देऊन ॲलेक स्टीवर्ट व फटकेबाज नील फेअरब्रदर यांचे महत्वपूर्ण बळी आपल्या नावे केले होते.
कारकिर्दीची शानदार सुरुवात करणाऱ्या आकीबला आपल्या प्रदर्शनात निरंतर ठेवता आली नाही. १९९४ नंतर त्याच्या कारकिर्दीत मोठा उतार आला. त्याच वेळी, पाकिस्तानच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये शोएब अख्तर धुमाकूळ घालत होता. त्याच्यासारख्या नवीन गोलंदाजांमुळे अकीबला राष्ट्रीय संघातील आपली जागा गमवावी लागली. वयाच्या फक्त २६ व्या वर्षी त्याने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
आकीब जावेदच्या गोलंदाजीला भारतीय संघासोबत खेळताना विशेष धार चढत. त्याने भारताविरुद्ध ५४ बळी आपल्या नावे केले होते.
क्रिकेट पासून दूर झाल्यानंतर त्याने पाकिस्तानच्या युवा संघाला २००४ च्या १९ वर्षाखालील मुलांच्या विश्वचषकाचे विजेतेपद मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले. सध्या तो, यूएई राष्ट्रीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे.
इतर पाकिस्तानी खेळाडूंप्रमाणे आकीब कधीच कोणत्या वादात पडला नव्हता. तो ज्या काळात खेळला तेव्हा मॅच फिक्सिंगसारखी प्रकरणे व पाकिस्तान आणि वाद असे समीकरण असताना त्याचे असल्या गोष्टीत कधीच नाव आले नाही. आकीब शेवटपर्यंत एक स्वच्छ प्रतिमेचा खेळाडू म्हणून राहिला.
महत्त्वाच्या बातम्या –
क्या बात! टोकियो ऑलिंपिक्समधील ‘ही’ एँकर दिसते खूपच सुंदर; माहीच्या रांचीतला आहे जन्म
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १९: पाकिस्तानला नेहमीच घाम फोडणारा वेंकटेश प्रसाद
थोडीशी मजामस्ती! जेव्हा पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये झाली ख्रिस गेलची एन्ट्री, रंगला हास्यकल्लोळ