मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) यांच्यात झालेल्या सामन्यात आरसीबीचा विस्फोटक फलंदाज एबी डिविलियर्सने 24 चेंडूत 55 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे बंगलोरच्या संघाने मुंबईला 202 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरादाखल मुंबईचा संघ 201 धावाच करू शकला त्यामुळे सामना बरोबरीत सुटला.
सुपर ओव्हरमध्ये मुंबईने सात धावा केल्या आणि आरसीबीतर्फे सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी आलेल्या एबी डिविलियर्स आणि कर्णधार विराट कोहली यांनी सहजपणे हे लक्ष गाठले.
डिविलियर्सने पूर्ण केल्या 4500 धावा
या दरम्यान आरसीबीचा स्टार फलंदाज डिविलिअर्सने आयपीएलमध्ये 4500 धावा पूर्ण केल्या. या स्पर्धेत अशी कामगिरी करणारा तो एकूण सहावा आणि दुसराच परदेशी फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी आरसीबीचा कर्णधार विराट कोहली, चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज सुरेश रैना, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर आणि दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवन यांनी ही कामगिरी केली आहे.
डेविड वॉर्नरनेही पूर्ण केल्या आहेत 4500 धावा
डिविलिअर्स व्यतिरिक्त सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर आयपीएलमध्ये 4500 पेक्षा जास्त धावा करणारा एकमेव परदेशी खेळाडू आहे. 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला डिविलियर्स आरसीबीमध्ये येण्यापूर्वी दिल्ली संघाकडून खेळत होता.
2015 आणि 2016 या हंगामातही केली उत्कृष्ट कामगिरी
एबी डिविलियर्सने आयपीएल 2016 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्या हंगामात त्याने 16 सामन्यात 687 धावा केल्या होत्या आणि विराट कोहलीने 973 धावा केल्या होत्या. त्या हंगामात आरसीबी संघ उपविजेता ठरला होता. 2015 च्या हंगामातही डिविलियर्सनेही 500 हून अधिक धावा केल्या होत्या. त्या हंगामात त्याने 16 सामन्यात 513 धावा केल्या होत्या.
डिविलियर्सची आयपीएल कारकीर्द
डिविलिअर्स आतापर्यंत आयपीएलमध्ये 157 सामने खेळला आहे. या काळात त्याने 145 डावात 40.49 च्या सरासरीने 4535 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 152.07 इतका आहे. त्याने 3 शतके आणि 35 अर्धशतके झळकावली असून त्याची सर्वोत्तम धावसंख्या 133 आहे. तो 34 वेळा नाबाद राहिला आहे.