टी२० क्रिकेट सुरू झाल्यापासून खेळाडू आक्रमक क्रिकेट खेळू लागले. खेळण्याची शैली बदलली, खेळपट्टीचे स्वरूप बदलले. काही ठिकाणी सीमारेषाही आतमध्ये घेतल्या गेल्या. याचा परिणाम असा झाला की, युवा खेळाडू वेगवान क्रिकेटवर भर देऊ लागले.
या सगळ्या प्रकारात कसोटी क्रिकेटकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होण्याचे प्रमाण वाढले. जगात जवळपास सर्व देशांनी आपापल्या टी२० लीग सुरू केल्या. वनडे क्रिकेटदेखील बदलले. एकंदरीतच क्रिकेट आपल्या मूळ स्वरूपापासून दूर चालले होते.
२०११ नंतर क्रिकेटमधील बरेचसे जुनेजाणते व दिग्गज खेळाडू निवृत्त झाले होते. सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, जॅक कॅलीस, ऍलिस्टर कुक अशी काही मोजकी मंडळी कसोटी क्रिकेट खेळत होती. प्रत्येक देशाकडे आपापले भविष्यातल्या सितारे तयार होते. जे तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करत होते. त्यापैकी एक म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स.
तसे तर, डिव्हिलियर्सने २००४ सालीच आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तो दक्षिण आफ्रिका संघाचा नियमित सदस्य देखील होता. सुरुवातीला यष्टिरक्षक म्हणून त्याने कारकीर्द सुरू केली. ग्रॅमी स्मिथ, जॅक कॅलिस, हाशिम आमला, डेल स्टेन यांच्यासोबत तोदेखील दक्षिण आफ्रिका क्रिकेटची धुरा वाहत होता.
२०१२ मध्ये दक्षिण आफ्रिका संघ तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला. दक्षिण आफ्रिकेचा संघ त्यावेळी जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी होता आणि जर ते या मालिकेत पराभूत झाले तर, त्यांचे अव्वल स्थान जाणार होते. ऑस्ट्रेलियाचा सर्वकालीन महान फलंदाज व कर्णधार रिकी पॉंटिंग या मालिकेनंतर निवृत्त होणार होता.
मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेन येथे बरोबरीत सुटला. खराब सूर्यप्रकाश व पावसाच्या व्यत्ययामुळे जवळपास दीड दिवसांचा वेळ वाया गेल्याने हा निकाल अपेक्षितच होता. दोन्ही संघांनी फलंदाजीचा यथेच्छ सराव केला. दक्षिण आफ्रिकेकडून अष्टपैलू जॅक कॅलिसने १४७ तर ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मायकल क्लार्कने नाबाद २५९ धावांची खेळी केली.
दुसरी कसोटी ॲडलेडमध्ये होती. मायकल क्लार्कने नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारली. दक्षिण आफ्रिकेकडून फाफ डु प्लेसिसने कसोटीमध्ये पदार्पण केले. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर व एड कोवान हे सलामीवीर मैदानात उतरले. परंतु, कॅलिस व मॉर्कलने कोवान, रिकी पॉंटिंग, रॉब क्विनी यांना झटपट माघारी पाठवत ऑस्ट्रेलियाची अवस्था तीन बाद ५५ अशी केली. लंचपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १०२ होती.
दुसऱ्या सत्रात मात्र वॉर्नर व क्लार्क ही जोडी जमली धावफलक हलता ठेवत दोघे अर्धशतकापार पोहोचले. वॉर्नरने आक्रमण करत लवकरच आपले शतक पूर्ण केले. तो ११२ चेंडूत ११९ धावा काढून बाद झाला. कर्णधार क्लार्कच्या जोडीला अनुभवी माईक हसी आला. दोघांनीही आफ्रिकन गोलंदाजांवर वर्चस्व दाखवत खेळ सुरू ठेवला. चहापानाआधीच्या षटकात क्लार्कने आपले शतक पूर्ण केले.
चहापानानंतर दिवसातील शेवटच्या सत्रात क्लार्कचा चांगला जम बसल्याने तो आक्रमकपणे खेळू लागला. हसीने देखील आपल्या कर्णधाराच्या पावलावर पाऊल टाकत अर्धशतक पूर्ण केले. क्लार्कने धडाक्यात आपले द्विशतक पूर्ण केले. त्याचे सलग दोन सामन्यात दुसरे तर एकाच वर्षात चौथे द्विशतक होते. पुढच्याच षटकात माइक हसीने देखील शंभरी गाठली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने ५ बाद ४८२ अशी भक्कम धावसंख्या उभारली.
दुसऱ्या दिवशी मात्र आफ्रिकन गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचे फलंदाज लवकर बाद केले. जेम्स पॅटिन्सनने ४३ धावांचा हातभार लावला. ऑस्ट्रेलिया ५५० धावांवर सर्वबाद झाली.
प्रत्युत्तरादाखल, दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर ग्रॅमी स्मिथ व अल्विरो पीटरसन यांनी नांगर टाकत १३९ धावांची सलामी दिली. पीटरसन ५४ धावांवर बाद झाला. इतर फलंदाज अपयशी होत असताना स्मिथने शतक झळकावले. फाफ डु प्लेसिस (७८) व जॅक कॅलिस (५८) यांनी प्रतिकार करत दक्षिण आफ्रिकेला ३८८ धावांपर्यंत मजल मारून दिली.
ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावाच्याआधारे, १६२ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने सांघिक खेळाच्या जोरावर २६७ धावांवर डाव घोषित करत, दक्षिण आफ्रिकेला ४३० धावांचे आव्हान दिले. ऑस्ट्रेलियाकडून माइक हसीने एकमेव अर्धशतक झळकावले तर द. आफ्रिकेकडून मार्कल व क्लेनवेल्ट यांनी प्रत्येकी तीन बळी मिळविले.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ४३० धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी किंवा सामना वाचवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला दीड दिवस व साडेचार सत्रे खेळून काढावी लागणार होती. डाव सुरू होताच कर्णधार स्मिथ खाते न खोलता तंबूत परतला. भरवशाचा हाशिम आमला देखील फार काळ टिकू शकला नाही. चहापानापर्यंत जॅक रूडोल्फ व अल्विरो पीटरसन नाबाद राहिले. तिसरे सत्र सुरू होताच रूडोल्फदेखील माघारी परतला.
मैदानावर एबी डिव्हिलियर्सचे आगमन झाले. वनडे व टी२० मध्ये गोलंदाजांना नको नको करणार, चौकार-षटकारांची आतिषबाजी करण्यात सराईत असलेला डिव्हिलियर्स आज असाच काहीतरी चमत्कार करून दक्षिण आफ्रिकेला विजयी करेल अशी सर्वांनी अपेक्षा बाळगली. डिव्हिलियर्सने पीटरसनच्या सोबत डाव नव्याने सुरू केला. दोघे आजचा दिवस खेळून काढणार असे वाटत असतानाच पीटरसन, पीटर सिडलच्या एका अप्रतिम चेंडूवर त्रिफळाचीत झाला.
डिव्हिलियर्सच्या जोडीला त्याचा शालेय क्रिकेटपासूनचा सहकारी आणि आपला पहिला सामना खेळत असलेला फाफ डु प्लेसिस आला. दोघांनी कसलाही धोका न पत्करता ते संपूर्ण सत्र खेळून काढले. डु प्लेसीस १९ तर डिव्हिलियर्स १२ धावांवर नाबाद होते.
पाचव्या दिवशी खेळ सुरू झाला आणि दोघांनीही नांगर टाकला. डिव्हिलियर्स-डु प्लेसीसने धावा न काढता फक्त चेंडू सोडवण्यावर भर दिला. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज जाम वैतागले. पाचव्या दिवशी सकाळी ७७-४ या धावसंख्येवरून सुरू केलेला डाव पाचव्या दिवशीच्या लंच पर्यंत १२६-४ इथपर्यंत आला होता.
डु प्लेसीस व डिव्हिलियर्स यांना बाद करण्यासाठी ऑस्ट्रेलियन कर्णधार क्लार्कने अक्षरशः डेव्हिड वॉर्नर व रिकी पॉंटिंग यांना गोलंदाजी करायला लावली. लंचनंतर डाव सुरू झाल्यावर डिव्हिलियर्सने ३१-३३ हा पल्ला गाठायला ३० चेंडू खेळले. शेवटी पीटर सिडलच्या चेंडूवर तो चकला. बाद होण्याआधी डिव्हिलियर्सने २२० चेंडूत ३३ धावा केल्या होत्या आणि दक्षिण आफ्रिकेला सामना वाचवण्याच्या दिशेने नेले होते. झटपट शतक झळकावणाऱ्या या खेळाडूकडून अशा प्रकारची खेळी पाहून सर्वजण अवाक होते. डिव्हिलियर्स बाहेर जाताना सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्याला अभिवादन केले. डु प्लेसिस-डिव्हिलियर्स जोडीने तब्बल ६८ षटके तग धरत ८९ धावांची अमुल्य भागीदारी केली होती.
डिव्हिलियर्स परतला तरीही आफ्रिकेला अजून दीड सत्र खेळायची होती. डु प्लेसिस चांगलाच जमलेला. त्याच्या सोबतीला अनुभवी कॅलिस मिळाला. दोघांनीही पून्हा तशाच पद्धतीने डाव पुढे चालू ठेवला.
पाचव्या दिवशी चहापानाला खेळ थांबला तेव्हा, दक्षिण आफ्रिका २१२-५ अशा स्थितीत होते. येथून सामना जिंकणे अवघड होते परंतु सामना अनिर्णित राखण्यात यश येऊ शकते असा विश्वास सर्वांना वाटला. डु प्लेसिस ९४ तर कॅलिस ३८ धावांवर खेळत होते. ऑस्ट्रेलियन संघाच्या मनात मात्र अजूनही सामना जिंकू अशी आशा होती.
अखेरच्या निर्णायक सत्राचा खेळ सुरु झाला. डु प्लेसिसने आपल्या खेळाचा जराही अंदाज बदलला नाही. कॅलीस मात्र ८ धावांची भर घालून माघारी परतला. त्याच्याजागी आलेला दिग्गज गोलंदाज डेल स्टेन याने आपले पूर्ण कसब दाखवत तब्बल २८ चेंडू निर्धाव खेळून काढले. दरम्यान डु प्लेसिसने आपल्या पदार्पणातच अतिउच्च दर्जाचे शतक झळकावले. मॉर्केलला साथीला घेत तो ११९ धावांवर अखेरपर्यंत नाबाद राहिला. सामना अनिर्णित राहिला.
तिसरी कसोटी जिंकत दक्षिण आफ्रिकेने मालिका जिंकली. सोबतच कसोटी क्रमवारीतील आपले अव्वल स्थान हे टिकवले. महान रिकी पॉंटिंगच्या कारकिर्दीची अखेर पराभवाने झाली. दक्षिण आफ्रिकन खेळाडूंनी रिकी पॉंटिंगला ‘गार्ड ऑफ ऑनर’ देत अलविदा केले.
डु प्लेसिसच्या या खेळीने सांगितले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर दक्षिण आफ्रिकेच्या अजून एका दिग्गजाचे आगमन झाले आहे. डु प्लेसिसने दीड दिवस किल्ला लढवला मात्र डिव्हिलियर्सने आपल्या शैलीच्या विपरीत २२० चेंडूत केलेल्या ३३ धावा क्रिकेटरसिकांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेल्या.
टेस्ट इनिंग्स स्पेशल लेखमालिकेतील वाचनीय लेख
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ३- गब्बरची कसोटी क्रिकेटमध्ये जबर एन्ट्री
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग २- असामान्य खेळाडूकडून झालेली असामान्य खेळी
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग १- दिग्गजांच्या मांदियाळीत गंभीरची ती अजरामर मॅरेथॉन खेळी