पुणे ।अहमदनगर येथील वाडिया मैदानावर घेण्यात आलेल्या विभागीय स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींच्या गटात पुणे मनपा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाने पुणे जिल्हा (ग्रामीण) संघाला पराभूत करताना विजेतेपद पटकावले.
अंतिम लढतीमध्ये आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालय संघाने १२-६ असे ६ गुणांच्या फरकाने पुणे जिल्हा संघाला पराभूत केले. विजयी संघाकडून आयेशा शेख, अक्सा अन्सारी व इकरा सैय्यद यांनी चमकदार कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीमध्ये सोलापूर जिल्हा संघाने अहमदनगर जिल्हा संघाला १२-८ असे पराभूत केले. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये आबेदा इनामदार संघाने अहमदनगर जिल्हा संघाला १०-० असे एकतर्फी पराभूत केले.
विजयी संघाकडून शेह्नूर सिद्दिकी, आफरीन शेख यांनी शानदार कामगिरी बजावली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये पुणे जिल्हा संघाने सोलापूर जिल्हा संघाला १४-८ असे पराभूत करून अंतिम फेरी गाठली.
संघाने मिळविलेल्या यशासाठी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटिन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्षा आबेदा इनामदार, आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती आयेशा शेख, उपप्राचार्य गफ्फार सैय्यद यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संघाला गुलजार शेख, दानिश सैय्यद व मुसाद्दिक चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.