fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

जाणून घ्या ‘भारताचे गॅरी सोबर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिग्गज क्रिकेटपटूबद्दल

Remembering Indian Cricketer Late Rusi Surti

भारताचे गॅरी सोबर्स अशी ओळख माजी अष्टपैलू क्रिकेटपटू रुसी सुरती यांनी मिळवली होती. त्यांचा जन्म २५ मे १९३६ ला गुजरातमधील सुरत येथे झाला. त्यांना एक अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणूनच नाही तर त्यांच्या उत्तम क्षेत्ररक्षणासाठीही ओळखले जात होते. मात्र त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द केवळ २६ कसोटी सामन्यांपर्यंतच मर्यादीत राहिली. त्यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी १२ जानेवारी २०१३ ला निधन झाले.

त्यांनी डिसेंबर १९६० मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याआधी त्यांनी १८ प्रथम श्रेणी सामने खेळले होते. यात त्यांनी त्यांच्या अष्टपैलू कामगिरीने प्रभावित केले होते.

त्यांनी कसोटी कारकिर्दीत २६ सामने खेळताना २८.७० च्या सरासरीने ९ अर्धशतकांसह १२६३ धावा केल्या. तसेच ४२ विकेट्स घेतल्या. याबरोबरच त्यांनी २६ झेलही घेतले आहेत. त्यांनी वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंड या संघांविरुद्ध सामने खेळले.

तसेच ते देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरात आणि राजस्थान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी १६० प्रथम श्रेणी सामने खेळले असून यात त्यांनी २८४ विकेट्स घेण्याबरोबरच ३०.९० च्या सरासरीने ८०६६ धावा केल्या आहेत. यात त्यांच्या ६ शतकांचा आणि ५४ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्यांनी १२२ झेलही घेतले आहे.

याबरोबरच त्यांनी ५ अ दर्जाचे सामनेही खेळले आहेत. यात त्यांना ६ विकेट्स घेण्यात आणि १७९ धावा करण्यात यश आले आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना १९६९ मध्ये खेळला. त्यानंतर ते १९७० ला ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडममध्ये स्थायिक झाले. तिथे त्यांनी क्वीन्सलँडमकडूनही सामने खेळले.

रुसी हे डावखुरे फलंदाज आणि गोलंदाज होते. त्यांना चेंडूला सीम, स्विंग आणि स्पिनही करण्याची कला अवगत होती. तेही ते डाव्याहाताने गोलंदाजी करत असल्याने त्यांना भारताचे सोबर्स म्हटले जात होते.

त्यांनी त्यांची सर्वोत्तम कामगिरी १९६७-६८ च्या दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यात केली होती. त्यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ४ सामन्यात भारताकडून सर्वाधिक ३६७ धावा केल्या होत्या. यात त्यांच्या ४ अर्धशतकांचा समावेश होता. तसेच १५ विकेट्स त्यांनी घेतल्या होत्या. त्याचबरोबर न्यूझीलंड दौऱ्यात त्यांनी ४ सामन्यात ३२१ धावा केल्या होत्या आणि ७ विकेट्स घेतल्या होत्या.

ट्रेंडिंग घडामोडी – 

‘या’ दिव्यांग मुलाला गोलंदाजी करताना पाहिलंय का? पाहून व्हाल अवाक्…

पाकिस्तानमधील मानवधिकार कार्यकर्ता म्हणतो, आफ्रिदी थोडी तरी लाज बाळग

टीम इंडियाचा नॅशनल कॅंप बंगळुरुऐवजी होणार या ठिकाणी?

You might also like