देशांतर्गत क्रिकेटच्या नव्या हंगामापूर्वी मुंबईच्या संघात सर्वकाही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. युवा अर्जुन तेंडुलकर व अनुभवी सिद्धेश लाड यांच्यानंतर आता मुंबई संघाचा माजी कर्णधार आदित्य तरेनेही मुंबई संघाशी असलेले आपले नाते तोडले असून, तो आगामी हंगामात नव्या संघासोबत खेळताना दिसणार आहे. अर्जुन आणि सिद्धेश यांनी गोवा संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता. आता तरे उत्तराखंड संघाकडून खेळताना दिसणार आहे.
मुंबई संघाची साथ सोडत असल्याचे त्याने एका निवेदनाद्वारे सांगितले. त्याने लिहिले की, ‘मला मुंबई संघाबद्दल काय वाटते ते शब्दात मांडणे कठीण आहे. वयाच्या 16 व्या वर्षापासून मला मुंबई संघाकडून खेळण्याची संधी मिळाली होती. आता वयाच्या 34 व्या वर्षापर्यंत मी याच संघाकडून खेळलो आहे. या प्रवासाचा मला आनंद आहे. मला मुंबईचा क्रिकेटपटू म्हणून घेण्याचा अभिमान वाटतो. मी खोटे बोलणार नाही. मात्र, गोष्टी ज्या प्रकारे संपल्या आहेत त्यामुळे मला नक्कीच त्रास होत आहे. आता नवीन आव्हानाची वेळ आहे. मी माझ्या करिअरच्या नव्या टप्प्यात पाऊल ठेवण्यासाठी खूप उत्सुक आहे.”
मुंबईने अखेरच्या वेळी जिंकलेल्या रणजी ट्रॉफी विजयावेळी आदित्य तरे संघाचा कर्णधार होता. मात्र, यावेळी हंगामापूर्वी निवडलेल्या प्री सिजन कॅम्पसाठी तरेच्या नावाचा विचार झाला नव्हता. आता हार्दिक तामोरे मुंबईच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळताना दिसेल.
यावर्षी रणजी हंगामात उपांत्यपूर्व फेरीपर्यंत प्रवास केलेल्या उत्तराखंड संघाने तरे व्यतिरिक्त पंजाबचा अनुभवी सलामीवीर जीवनज्योत सिंग याला देखील गेस्ट प्लेयर म्हणून संघात सामील केले आहे. तर स्वप्निल सिंग याला संघात कायम ठेवलेय. तरे यावर्षी रणजी ट्रॉफीमध्ये उत्तराखंडचे नेतृत्व करताना दिसेल.