तालिबानचा परिणाम आता अफगाणिस्तान क्रिकेटवर दिसून येत आहे. तालिबानने बुधवारी (१० नोव्हेंबर) माजी अष्टपैलू खेळाडू मीरवाईस अश्रफ यांची अजिझुल्ला फाजली यांच्या जागी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. फाजली यांनी दोन महिने या पदाची जबाबदारी सांभाळली.
एका वृत्तानुसार, सध्याच्या टी-२० विश्वचषकादरम्यान राष्ट्रीय खेळाडूंनी अबुधाबीमध्ये तालिबानी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि मागणी केली, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
तालिबानने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमिरातीच्या पंतप्रधानांनी मीरवाइज अश्रफ यांची अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.’
अश्रफ यांनी ४६ एकदिवसीय आणि २५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अफगाणिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी शेवटचा सामना २०१६ मध्ये खेळला होता. अफगाणिस्तानचा संघ सध्या सुरू असलेल्या टी२० विश्वचषकाच्या सुपर १२ टप्प्यातून बाद झाला आहे. कर्णधार मोहम्मद नबीने अफगाणिस्तान संघाला पाचपैकी दोन सामने जिंकवून दिले. अफगाणिस्तान संघाला पाकिस्तान, भारत आणि न्यूझीलंडन या संघांकडून पराभव स्वीकारावा लागला.
तत्पूर्वी, अमेरिका आणि नाटो सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानवर काबीज केला आहे. त्यानंतर देशातील राजकीय, सामाजिक स्थिती ढासळली आहे. परिणामी अफगाणिस्तान क्रिकेटची परिस्थिती देखील बिघडली आहे.
महिलांना क्रिकेट खेळण्याची परवानगी न देण्याच्या तालिबानच्या कठोर भूमिकेमुळे अफगाणिस्तान संघावर बंदी घालण्याचा विचार होत आहे. ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टीम पेन याने विश्वास व्यक्त केला आहे की, इतर संघ त्यांना खेळण्यास नकार देऊ शकतात.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी (५ ऑक्टोबर) अफगाणिस्तानविरुद्धचा कसोटी सामना पुढे ढकलला होता. दोन्ही देश या महिन्याच्या अखेरीस ब्रिस्बेनमध्ये ऐतिहासिक कसोटी सामना खेळणार होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले की, परिस्थिती स्पष्ट झाल्यानंतरच ते या सामन्याचे आयोजन करतील.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, यांचा असा नियम आहे की सर्व कसोटी सदस्य देशांमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही संघ असणे आवश्यक आहे. या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या बोर्डाच्या बैठकीत याबाबत विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तरीही अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने झिम्बाब्वे दौऱ्यावर तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी संघ जाहीर केले आहेत. सामन्यांची तारीख अद्याप ठरलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
दुसऱ्या उपांत्य सामन्यात नशीब आजमावणार पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया? अशी असेल प्लेइंग इलेव्हन
जेव्हा शाहीन आफ्रिदीने लाईव्ह सामन्यात विराट, रोहित, केएल राहुलची उडवली होती खिल्ली, पाहा व्हिडिओ
शापितांचा शापित ‘अमोल मुजुमदार’