आयपीएलमध्ये खळबळ माजवणारा अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज रहमानुल्लाह गुरबाजसोबत एक मोठी दुर्घटना घडली आहे. शापगिझा क्रिकेट लीगमधील सराव सत्रादरम्यान एक चेंडू त्याच्या मानेला लागला, ज्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.
22 वर्षीय गुरबाजनं अफगाणिस्तानसाठी 63 टी20, 40 एकदिवसीय आणि 1 कसोटी सामना खेळला आहे. अफगाणिस्तानला 2024 टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहचवण्यात त्यानं महत्त्वाची भूमिका बजावली होती. अफगाणिस्तानसाठी टी20 मध्ये त्यानं 26.3 ची सरासरी आणि 135.49 च्या स्ट्राईक रेटनं 1657 धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावे 1467 धावा आहेत. येथे त्याची सरासरी 37.62 आणि स्ट्राईक रेट 88.53 आहे.
रहमानुल्लाह गुरबाज हा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी सलामीला येतो. 2023 मध्ये फ्रँचायझीसाठी पदार्पण करणाऱ्या गुरबाजनं पदार्पणाच्या हंगामात 11 सामने खेळले, ज्यात त्यानं दोन अर्धशतकांसह 227 धावा केल्या होत्या. 2024 मध्ये त्याला फक्त दोन सामने खेळाण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये त्यानं 31 च्या सरासरीनं 62 धावा केल्या.
अफगाणिस्तानमध्ये आयपीएल खूप लोकप्रिय आहे. त्याच्या धर्तीवर देशात ही स्पर्धा 2013 मध्ये सुरू करण्यात आली. शापगिझा म्हणजे सहा. यात सहा संघ सहभागी होतात. यंदा या स्पर्धेला 12 ऑगस्टपासून सुरुवात झाली असून अंतिम सामना 24 ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे. स्पर्धेत बँड-ए-आमिर ड्रॅगन्स, स्पिन घर टायगर्स, अमो शार्क्स, मिस एनेक नाइट्स, बूस्ट डिफेंडर्स आणि अमो शार्क्स असे एकूण सहा संघ खेळतात.
हेही वाचा –
गौतम गंभीरनं निवडली त्याची सर्वकालीन वर्ल्ड इलेव्हन, संघात तीन पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा समावेश
बीसीसीआयची बल्ले-बल्ले! आयपीएलद्वारे इतक्या कोटींची कमाई, आकडा जाणून बसेल धक्का!
जय शाह बनणार आयसीसीचे नवे अध्यक्ष? लवकरच नव्या भूमिकेत दिसण्याची शक्यता