अत्यंत कमी कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले स्वतःचे स्थान निर्माण करणार्या अफगाणिस्तान क्रिकेट संघाने आता आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्याची तयारी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने, अफगाणिस्तान सरकारने देशातील पहिले सुसज्ज क्रिकेट स्टेडियम बनवण्यास परवानगी दिली. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्वीट करून याबाबतची माहिती दिली.
अफगानिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्वीट करून दिली माहिती
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विटमध्ये लिहिले आहे की, “अफगाणिस्तानचे राष्ट्रपती मोहम्मद अश्रफ गणी यांनी काबुलशेजारी आलोखेल या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानासाठी १२,००० स्क्वेअर मीटर जागेला परवानगी दिली आहे.”
या ट्विटसोबतच मैदानाच्या नियोजित आराखड्याचे छायाचित्रदेखील प्रदर्शित केले गेले आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष फरहान युसुफझाई यांनी या घोषणेवर प्रतिक्रिया देताना म्हटले, “काबुलमध्ये स्टेडियमला मंजुरी मिळाल्याचा आनंद आहे. आता अफगाणिस्तानात असे ठिकाण (स्टेडियम) असणार आहे, जिथे चाहते त्यांचे आवडते क्रिकेटपटू पाहण्यास सक्षम असतील. याबद्दल मी राष्ट्रपतींचेही आभार मानतो. ते नेहमीच देशात क्रिकेटला चालना देण्याचा प्रयत्न करतात.”
या सुविधा असतील नव्या स्टेडियममध्ये
या नव्या स्टेडियममध्ये ३५ हजार प्रेक्षक सामन्यांचा आनंद घेऊ शकतात. खेळाडूंच्या कुटुंबासाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था असेल. स्टेडियममध्ये स्विमिंग पूल, इनडोअर आणि आऊटडोर अकादमी, हेल्थ क्लिनिक, कार पार्किंग, प्रशासकीय कार्यालय आणि मशिदीसह पंचतारांकित विश्रामगृह असेल.
भारतात आहे अफगाणिस्तानचे गृहमैदान
अफगाणिस्तानने सुरुवातीच्या दिवसात युएईतील शारजाहला आपले होम ग्राऊंड बनविले होते. यानंतर एसीबीने भारतातील देहरादूनमध्ये आपले सामने खेळले. सध्या, अफगाणिस्तान संघ लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये सराव करतो.
अफगाणिस्तान क्रिकेट संघाने केली आहे मोठी प्रगती
अफगाणिस्तान क्रिकेट संघाने अवघ्या १५ वर्षांच्या काळात मोठी प्रगती केली आहे. अनेक वर्षे क्रिकेट खेळणाऱ्या संघांना मागे टाकत अफगाणिस्तानने मागील ९ वर्षात तीन टी२० विश्वचषक आणि २ वनडे विश्वचषक खेळले आहेत. राशिद खान, मोहम्मद नबी, मुजीब उर रहमान यांसारख्या अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव झळकावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
”युवा खेळाडू फक्त मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष देतात’, माजी भारतीय दिग्गजाने व्यक्त केली चिंता
तेव्हा वाडेकर यांच्या आणि आता कोहलीच्या टीम इंडियाची निचांकी धावसंख्या, पाहा दोन सामन्यांतील समानता
“त्या दौऱ्यामुळे माझ्यात बदल घडला”, सचिनने दिला जुन्या आठवणींना उजाळा