जिथे खेळाडू आजकाल व्यस्त वेळापत्रकाची तक्रार करताना दिसतात, त्याच आजच्या काळात एका क्रिकेटपटूने एकाच दिवसात २ वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतके केल्याचे ऐकून आश्चर्य वाटेल ना? पण असा पराक्रम केला आहे अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद शेहजादने. त्याने २०१७ ला संयुक्त अरब अमिरातीमध्ये ८ आयसीसीच्या सहयोगी सदस्ययी संघात खेळवण्यात आलेल्या डेझर्ट टी२० स्पर्धेत हा कारमाना केला होता.
या स्पर्धेतील दोन्ही उपांत्य सामने आणि अंतिम सामना एकाच दिवशी म्हणजे २० जानेवारी २०१७ ला दुबईमध्ये खेळवण्यात आले होते. पहिला उपांत्य सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११.३० वाजता अफगाणिस्तान विरुद्ध ओमान संघात होणार होता.
त्या सामन्यात ओमानने प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानला १५० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानकडून सलामीला फलंदाजीला उतरलेल्या शेहजादने ६० चेंडूत ८० धावांची खेळी केली होती. यात त्याने ८ चौकार आणि ३ षटकार मारले होते. त्याला नवरोज मंगल(३४) आणि त्यावेळीचा अफगाणिस्तानचा कर्णधार असघर स्टानिकझाईने(२५) (आत्ताचे नाव असघर अफगाण) चांगली साथ दिली होती. त्यामुळे अफगाणिस्तानने हा सामना ८ विकेट्सने सहज जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला.
दुसरा उपांत्य सामना २० जानेवारीलाच भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ४ वाजता सुरु झाला होता. स्कॉटलंड विरुद्ध आयर्लंड संघात हा सामना झाला होता. या सामन्यात आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना २११ धावा केल्या होत्या. त्याच्या प्रतिउत्तरादाखल स्कॉटलंडला ११३ धावाच करता आल्याने आयर्लंडने अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.
या २ उपांत्य सामन्यांनंतर २० जानेवारीलाच अंतिम सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ९ वाजता सुरुवात झाली. या सामन्यात आयर्लंडने प्रथम फलंदाजी केली. पण त्यांना अफगाणिस्तानच्या गोलंदाजी आक्रमणासमोर त्यांना ७१ धावाच करता आल्या. अफगाणिस्तानकडून नबीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या अफगाणिस्तानकडून शेहजादने पुन्हा एकदा अर्धशतकी धमाका करताना ४० चेंडूत नाबाद ५२ धावा करताना ९ चौकार आणि १ षटकार मारला. त्यावेळी अफगाणिस्तानने केवळ ८ षटकात ७५ धावा करत हा सामना १० विकेट्सने जिंकून विजेतेपद मिळवले.
या अर्धशतकाबरोबरच शेहजादने मोठा विश्वविक्रम केला. तो एकाच दिवसात २ वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला.
शेहजाद हा नेहमीच आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. पण त्यातही त्याची तब्येत जरा जास्त असल्याने त्याच्या फिटनेसवर नेहमीच प्रश्न उपस्थित होतो. पण याबद्दल शेहजाद म्हणतो, ‘मी जर कोहलीपेक्षा जास्त लांब षटकार मारु शकत असेल तर मला त्याच्यासारखा डाएट करण्याची गरज काय.’
शेहजादनेही अफगाणिस्तानला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक वेगळे स्थान मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २ कसोटी सामने, ८४ वनडे आणि ६५ टी२० सामने खेळले असून यात त्याने कसोटीत ६९ धावा, वनडेत २७२७ धावा आणि टी२०मध्ये १९३६ धावा केल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७ शतके केली आहेत.
वाचनीय लेख –
बक्षीसाची कार आपल्याकडे ठेवण्यासाठी ‘या’ क्रिकेटरने टीममेट्सला दिली होती अचंबित करणारी ऑफर
वनडे सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद होणारे ६ भारतीय फलंदाज
काय सांगता! एकाच दिवशी २ कसोटी सामने २ देशांविरुद्ध खेळणारा जगातील एकमेव संघ