भारतात कोराना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. रोज लाखोंच्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. असे असतानाच आता इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामालाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा बसला आहे. गेल्या २ दिवसात कोरोना व्हायरसने संघांच्या बायोबबलमध्येही प्रवेश केला असून काही खेळाडू आणि संघाशी निगडीत सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बीसीसीआयने आयपीएलचा हा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित केला आहे.
आयपीएल रद्द झाल्याने अनेक क्रिकेटप्रमींची निराशा झाली आहे. आयपीएलमध्ये भारताबरोबरच अनेक देशांचे दिग्गज खेळाडू खेळत असल्याने क्रिकेटप्रेमींसाठी आयपीएल ही एक पर्वणीच असते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहाता आयपीएल स्थगित करण्यात आले आहे, त्यामुळे अनेक भारतीय क्रिकेटप्रेमींना हा प्रश्न पडला आहे की भारतीय खेळाडूंना पुन्हा क्रिकेट खेळताना कधी पाहाता येईल? याच प्रश्नाचे उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
जर बीसीसीआयने येत्या काही दिवसात पुन्हा उर्वरित आयपीएल हंगाम घेण्याचे ठरवल्यास क्रिकेटप्रेमींना त्यांच्या आवडच्या खेळाडूंना टीव्ही किंवा डीजिटल माध्यमांवर पाहाता येईल. पण सध्याची परिस्थिती पाहाता नजीकच्या काळात भारतात स्पर्धा भरवणे कठिण दिसत आहे.
पण असे असले तरी क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे पुढील महिन्यात भारताचा आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. हा सामना इंग्लंडमध्ये साऊथँमप्टनला होणार आहे. त्यामुळे भारतातील क्रिकेट चाहत्यांना भारतीय खेळाडूंना या सामन्यात खेळताना पाहाता येणार आहे.
हा सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात १८ ते २२ जून दरम्यान होणार आहे. तसेच जरी भारत सध्या कोरोना व्हायरसच्या बिकट स्थितीमुळे इंग्लंडच्या रेड लिस्टमध्ये असला तरी हा सामना नियोजित वेळेत होईल, असा विश्वास काही दिवसांपूर्वी आयसीसीने व्यक्त केला आहे.
याशिवाय भारताला या सामन्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका इंग्लंडमध्ये खेळायची आहे. त्यामुळे भारतीय संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर इंग्लंडमध्येच थांबून ही कसोटी मालिका खेळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना या कसोटी मालिकेत खेळतानाही क्रिकेट चाहत्यांना पाहाता येणार आहे.
विशेष म्हणजे यानंतर टी२० विश्वचषकही होणार आहे. परंतु, हा विश्वचषक कोरोना व्हायरसच्या संकटामुळे भारतातून संयुक्त अरब अमिरातीमध्ये हलवण्याची शक्यता दाट आहे.
भारताचा इंग्लंड दौरा
१८ ते २२ जून – कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना (भारत विरुद्ध न्यूझीलंड), साऊथँम्पटन
कसोटी मालिका – इंग्लंड विरुद्ध भारत
४-८ ऑगस्ट – पहिला कसोटी सामना, नॉटिंगघम
१२-१६ ऑगस्ट – दुसरा कसोटी सामना, लॉर्ड्स
२५-२९ ऑगस्ट – तिसरा कसोटी सामना, हेडिंग्ले
२-६ सप्टेंबर – चौथा कसोटी सामना, लंडन
१०-१४ सप्टेंबर – पाचवा कसोटी सामना, मँटेस्टर
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल रद्द झाल्यामुळे स्टार स्पोर्ट्सला मोठा आर्थिक फटका, तब्बल ‘इतक्या’ कोटींचे नुकसान
आयपीएलच्या स्थगितीनंतर आता टी२० विश्वचषकावर काळे ढग; भारताऐवजी ‘या’ देशात होऊ शकते स्पर्धा