चेन्नई। भारतीय बुद्धिबळ महासंघाने येत्या 28 जुलै ते 10 ऑगस्ट 2022 दरम्यान चेन्नईत खेळल्या जाणार्या 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या 20 खेळाडूंचा भारतीय संघाची घोषणा केली आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या यजमानपदाचे आव्हान पेलण्यासाठी भारत सज्ज झाला आहे.
यजमान या नात्याने या स्पर्धेत भारत खुल्या गटात आणि महिला गटात प्रत्येकी दोन संघ उतरविणार असून इतिहासात पहिल्यांदाच भारत असे चार संघ खेळविणार आहे. एकूण 14 दिवस चालणार्या या स्पर्धेत जगभरातील 150 देशांमधील अव्वल खेळाडूंचे कौशल्य पाहण्याची संधी भारतीय क्रीडाशौकिनांना मिळणार आहे.
याआधी 2020 मध्ये झालेल्या व्हर्च्युअल ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार विदित गुजराथी, तसेच अनुभवी कृष्णन शशिकिरण, तसेच 19 वर्षीय अर्जुन एरिगैसी व एस. एल. नारायणन यांचा पहिल्या खुल्या गटातील भारतीय संघात समावेश आहे.
अर्जुनने गेल्या वर्षभरात चमकदार कामगिरी केली असून तितकीच प्रभावी कामगिरी करणार्या नारायणनबरोबरच त्याच्याकडेही सर्वांचे लक्ष राहील. भारताच्या दुसर्या संघात गेल्या काही दिवसांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करणार्या गुणवान युवा खेळाडूंचा समावेश आहे. त्यामध्ये आर. प्रग्नानंदा, निहाल सरीन, डी. गुकेश आणि गौरव साधवानी या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये पदार्पण करणार्या युवा खेळाडूंचा समावेश आहे. तसेच बी. अधिबनसारखे अनुभवी खेळाडूही या संघात आहेत. त्याने 2014 मध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले होते.
यजमानपदामुळे या सर्वोच्च दर्जाच्या स्पर्धेत दोन संघ उतरविण्याची संधी आम्हाला मिळाली असून त्यामुळे अनेक गुणी युवा खेळाडूंना संधीची दारे उघडणार आहेत. नाहीतर त्यांना आणखी काही वर्षे थांबावे लागले असते, असे सांगून बुद्धिबळ महासंघाचे सचिव भारतसिंग चौहान म्हणाले, की भारतीय संघांत युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण असून या संधीचा ते पुरेपूर उपयोग करतील, अशी आमची खात्री आहे. या खेळाडूंना पूर्वतयारीसाठी, तसेच स्पर्धेसाठीही आम्ही सुयश चिंतितो.
भारतीय महिला संघात प्रतिभाशाली कोनेरू हंपी आणि विश्वक्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेली द्रोणवल्ली हरिका यांच्यासह तानिया सचदेवचा समावेश असून त्यांच्यासह आर. वैशाली आणि भक्ती कुलकर्णी स्पर्धेत पदार्पण साजरे करतील. महिलांच्या दुसर्या संघात राष्ट्रीय विजेती सौम्या स्वामिनाथन, मेरी अॅन गोम्स आणि पद्मिनी राऊत यांच्यासह वंतिका आगरवाल आणि 15 वर्षीय दिव्या देशमुख यांचा समावेश आहे.
या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेणारा पाच वेळचा माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद भारतीय संघाचा मेन्टॉर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मी सध्या मोजक्या स्पर्धांमध्ये खेळत आहे. तसेच निहाल, प्रग्नानंदा, गुकेश आणि आणखी काही गुणवान युवा खेळाडूंना संधी मिळण्याची हीच योग्य वेळ असल्याने मी ऑलिम्पियाडपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे आनंदने सांगितले.
प्रग्नानंदा आणि वैशाली ही भारतीय संघातून एकाच वेळी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत खेळण्याचा मान मिळविणारी बहीण-भावाची जोडी ठरेल. याआधी सन 1988 मध्ये एन. सरिता आणि एन. सुधाकर यांनी 1988 मध्ये हा मान मिळविला होता.
ग्रॅन्डमास्टर प्रवीण ठिपसे भारतीय संघाचे पथकप्रमुख असतील. खुल्या गटातील दोन भारतीय संघासाठी ग्रॅन्डमास्टर श्रीनाथ आणि ग्रॅन्डमास्टर आरबी रमेश यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली असून महिलांच्या दोन संघांसाठी ग्रॅन्डमास्टर अभिजीत कुंटे आणि ग्रॅन्डमास्टर स्वप्निल धोपाडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी पेलतील.
भारताने याआधी 2014 ट्रॉम्सो बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये कांस्यपदक मिळविले होते. तर व्हर्च्युल ऑलिम्पियाडमध्ये भारताने 2020 मध्ये रशियासह संयुक्त विजेतेपद, तर 2021 मध्ये भारताने महिला गटात कांस्यपदकाची कमाई केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
Oops Moment: चौकार आडवायला गेलेल्या अनुकूल रॉयची खाली घसरली ट्राऊझर आणि मग…