आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कसोटी क्रिकेटकडे क्रिकेटचाहत्यांना आकर्षित करण्यासाठी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले होते. २०१९ मध्ये या स्पर्धेला प्रारंभ झाला होता. तसेच या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघांमध्ये खेळला जाणार आहे. या स्पर्धेत अनेक फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची प्लेइंग ११ निवडली आहे.
भारतीय संघासाठी १० कसोटी सामने खेळलेल्या माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोपडाने आपली प्लेइंग ११ निवडली आहे. या संघाचे नेतृत्त्वपद त्याने न्यूझीलंडला कर्णधार केन विलियम्सनकडे सोपवले आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे, त्याने आपल्या प्लेइंग ११ मध्ये विराट कोहली, जो रूट, जसप्रीत बुमराह आणि जेम्स अँडरसन यांसारख्या दिग्गज खेळाडूंना स्थान दिले नाहीये.
या फलंदाजांची केली निवड
आकाश चोपडाने म्हटले की, “रोहित शर्माने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ६४ च्या सरासरीने १०३० धावा केल्या आहेत. त्याला परदेशात जास्त सामने खेळायची संधी मिळाली नाही. परंतु त्याने भारतात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे माझ्या संघात त्याला जागा मिळाली आहे.”
तसेच दिमुथ करुणारत्नेने ५५च्या सरासरीने ९९९ धावा केल्या आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर आकाशने ऑस्ट्रेलियन संघाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांची निवड केली आहे. मार्नस लाबुशेनने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक १६७५ धावा केल्या आहेत. तसेच त्याने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याची ६ व्या क्रमांकासाठी निवड केली आहे. यासोबतच यष्टिरक्षक फलंदाज म्हणून त्याने रिषभ पंतला आपल्या संघात स्थान दिले आहे.
या गोलंदाजांना दिले संघात स्थान
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत गोलंदाजांनीही आपल्या कामगिरीचा डंका वाजवला आहे. या स्पर्धेत पॅट कमिन्स सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे. कमिन्सने आतापर्यंत १४ सामन्यात एकूण ७० गडी बाद केले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आहे. ब्रॉडने आतापर्यंत एकूण ६९ गडी बाद केले आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आहे. अश्विनने आतापर्यंत एकूण १३ सामन्यांत ६७ गडी बाद केले आहेत. या तीन गोलंदाजांसोबत त्याने ५१ गडी बाद करणाऱ्या टीम साउथीला देखील संघात स्थान दिले आहे.
अशी आहे आकाश चोपडाने निवडलेली विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील प्लेइंग ११
रोहित शर्मा, दिमुथ करुणारत्ने, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, केन विलियमसन (कर्णधार), रिषभ पंत, बेन स्टोक्स, पॅट कमिन्स, रविचंद्रन अश्विन, स्टुअर्ट ब्रॉड टिम साउथी
महत्त्वाच्या बातम्या-
‘ही’ परदेशी टी२० स्पर्धा गाजवण्यास भारतीय महिला क्रिकेटपटू सज्ज, स्म्रीतीचाही समावेश
कोहली-डिविलियर्सप्रमाणे त्यांच्या लाडक्या लेकींमध्येही मैत्री, ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल असंच
श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापुर्वी खेळाडूंसह प्रशिक्षकांना ‘ही’ गोष्ट करणे बंधनकारक, वाचा सविस्तर