ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड कसोटी संघात आगामी काळात होणाऱ्या ऍशेस मालिकेसाठी चाहते उत्सुक आहेत. ऍशेस मालिका पुढच्या महिन्यात सुरु होणार आहे. तत्पूर्वी दोन्ही संघ या मालिकेसाठी जोरदार तयारी करत आहेत. ऑस्ट्रेलिया संघाने नुकत्याच पार पडलेल्या टी२० विश्वचषकात अप्रतिम प्रदर्शन केले आणि विजेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलिया संघाकडून आगामी मालिकेत देखील अशाच प्रदर्शनाची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलिया संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक ऍड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
ऍशेस मालिकेच्या वेळापत्रकानुसार मालिकेतील पहिला सामना ८ डिसेंबरपासून गाबा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांचे खेळाडू तयारी करत आहेत. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॅकडोनाल्ड यांनी संघाच्या वेगवान गोलंदाजांकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांच्या मते कसोटी संघाचा नवीन कर्णधार पॅट कमिन्स, जोस हेजलवूड आणि मिचेल स्टार्क यांनी इंग्लंडविरुद्धच्या या महत्वाच्या मालिकेत कसल्याही प्रकारची तक्रार न करता चांगले प्रदर्शन केले पाहिजे.
नुकत्याच पार पडलेल्या टी२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या या तिन्ही गोलंदाजांनी सहभाग घेतला होता. तसेच संघासाठी महत्वाचे योगदान देखील दिले होते. याच कारणास्तव त्यांना ऍशेस मालिकेपूर्वी सराव करण्यासाठी अपेक्षित कालावधी मिळालेला नाही. यादरम्यान हे गोलंदाज आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा देशांतर्गत पातळीवर कसोटी क्रिकेट खेळले नाहीत. असे असले तरी, मॅकडोनाल्ड यांनी खेळाडू आगामी मालिकेतील प्रदर्शनानंतर कसल्याच प्रकारची कारणे सांगणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
गाबा स्टेडियमवरीव पहिल्या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या सराव सामन्यादरम्यान यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मला वाटते आम्ही जे काही केले आहे, त्याने आम्हाला खूप चांगले बनवले आहे. विलगीकरणामुळे जास्त तयारी आणि रणनीती तयार करण्यासाठी वेळ कमी मिळाला. पण मला वाटते की, आधुनिक क्रिकेटपटूच्या प्रतिभेसमोर या गोष्टींना महत्व नाही. त्यामुळे मला विश्वास आहे की, आमच्याकडून कसल्याच प्रकारची कारणे सांगितली जाणार नाहीत.”
ऍशेस मालिकेतील सामने पुढीलप्रमाणे होतील:
पहिला कसोटी सामना, ८-१२ डिसेंबर, २०२१ (गाबा)
दुसरा कसोटी सामना, १६-१० डिसेंबर (एडिलेड, डे-नाईट)
तिसरा कसोटी सामना, २६-३० डिसेंबर, २०२१ (मेलबर्न)
चौथा कसोटी सामना, ५-९ जानेवारी, २०२२ (सिडनी)
पाचवा कसोटी सामना, १४,१८ जानेवारी, २०२२ (पर्थ)