आशिया चषक 2023 स्पर्धेतील सुपर-4 सामन्यांना बुधवारपासून सुरुवात झाली. यातील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात खेळला गेला. हा सामना पाकिस्तान संघाने 7 विकेट्सने आपल्या नावावर केला. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन हा संघाच्या फलंदाजांच्या प्रदर्शनावर निराश दिसला. शाकिबने सामन्यानंतर फलंदाजांवर ताशेरे ओढत म्हटले, की त्यांनी या खेळपट्टीवर खूपच खराब फलंदाजी केली.
काय म्हणाला शाकिब?
पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) म्हणाला, “अशाप्रकारच्या खेळपट्टीवर खूपच खराब फलंदाजी प्रदर्शन. मात्र, आम्हाला पुढील सामन्यावर लक्ष द्यावे लागेल. पाकिस्तान एक नंबरचा संघ आहे. कारण, त्यांच्याकडे जागतिक स्तराचे गोलंदाज आहेत. हे गोलंदाज त्यांच्यासाठी गोष्टी सोप्या करत आहेत. आम्ही गोलंदाजी विभागात चांगले प्रदर्शन करत आहोत, पण फलंदाजी अपेक्षेनुसार झाली नाहीये. आम्हाला आणखी सातत्याने प्रदर्शन करण्याची गरज आहे.”
तो असेही म्हणाला, “मला वाटते, की आमच्या तीन गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. पाकिस्तानसारखे आमचे गोलंदाज मागील काही वर्षांमध्ये चांगली गोलंदाजी करत आहेत. मात्र, दुर्दैवाने अशाप्रकारच्या खेळपट्टीवर तुम्ही तोपर्यंत विकेट मिळवू शकत नाही, जोपर्यंत फलंदाज चुका करणार नाही.”
यावेळी शाकिबने म्हटले, त्यांच्या फलंदाजांनी सामान्य शॉट खेळून सुरुवातीलाच अनेक विकेट्स गमावल्या. तो म्हणाला, “आम्ही सुरुवातीलाच लवकर विकेट्स गमावल्या. आम्ही काही सामान्य शॉट खेळले. अशाप्रकारच्या खेळपट्टीवर आम्ही सुरुवातीच्या दहा षटकांमध्ये 4 विकेट्स गमावल्या नाही पाहिजे, पण असे होते. आमची भागीदारी चांगली होती. आम्हाला सात किंवा आठ षटके आणखी चांगली फलंदाजी करण्याची गरज होती.”
सामन्याचा आढावा
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, पाकिस्तानी गोलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. बांगलादेशला यावेळी 38.4 षटकात सर्व विकेट्स गमावत 193 धावाच करता आल्या. बांगलादेशकडून मुशफिकुर रहीम (64) आणि शाकिब (53) यांनाच अर्धशतक करता आले. यावेळी पाकिस्तानकडून हॅरिस रौफने 4, नसीम शाहने 3, शाहीन आफ्रिदी, फहीम अश्रफ आणि इफ्तिखार अहमद यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
यानंतर पाकिस्तानने 194 धावांचे आव्हान इमाम उल हक (78) आणि मोहम्मद रिझवान (63) यांच्या जोरावर 39.3 षटकातच गाठले. यावेळी पाकिस्तानने फक्त 3 विकेट्स गमावल्या होत्या. (asia cup 2023 pak vs ban skipper shakib al hasan sad with batting performance against pakistan in super 4)
हेही वाचाच-
प्रतीक्षा संपणार! तब्बल 9 वर्षांनंतर आयपीएल खेळताना दिसणार ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ घातक वेगवान गोलंदाज
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! जय शाहांकडे मागितले ‘ते’ पैसे, PCB अध्यक्षाची मेलद्वारे मागणी