मुंबई । आशिया टी-20 चषक स्पर्धा सप्टेंबरमध्ये पाकिस्तानात होणार आहेत. या स्पर्धेच्या नियोजना संदर्भात आशिया क्रिकेट परिषदेची (एसीसी) बैठक सोमवारी झाली. मात्र, या बैठकीत आशिया चषक स्पर्धेविषयी कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा देखील स्थगित होण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलिया येथे ऑक्टोबर- नोव्हेंबर दरम्यान होणार्या टी-20 विश्वचषकाविषयी 10 जूननंतर आयसीसी निर्णय घेणार आहे. आयसीसीच्या या निर्णयानंतर आशिया चषक स्पर्धेचा निर्णय होणार आहे.
ही स्पर्धा स्थगित करण्यावर चर्चा झाली असल्याची माहिती आशिया क्रिकेट स्पर्धेचे परिषदेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तसेच चीन मधील हांगझू येथे 2022 साली होणाऱ्या आशियाई स्पर्धेत एसीसीचा समावेश करण्याविषयी चर्चा करण्यात आली.
आशिया टी-20 चषक स्पर्धा यावर्षी पाकिस्तानात होणार आहेत. पण भारत पाकिस्तानमध्ये खेळू शकत नाही. त्यामुळे ही स्पर्धा दुसऱ्या देशात होऊ शकते.
या बैठकीत परिषदेने आशिया चषकाच्या नियोजनावर भर दिला आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे या स्पर्धेचे नियोजन कोणत्या ठिकाणी करता येईल त्या पर्यायांवर विचार करण्यात आला. तसेच आयसीसीच्या निर्णयानंतर अंतिम निर्णय घेण्यात असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
आशिया क्रिकेट परिषदेच्या या बैठकीस बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमूल हसन पेपोन, भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा हे देखील उपस्थित होते.