गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात रविवारी दुसऱ्या लढतीत एटीके मोहन बागानने जमशेदपूर एफसीवर 1-0 अशी मात केली.
फिजीचा आंतरराष्ट्रीय स्ट्रायकर रॉय कृष्णा याने पाच मिनिटे बाकी असताना केलेला गोल निर्णायक ठरला. या विजयाबरोबरच एटीकेएमबीने गुणतक्त्यात आघाडी घेतली.
फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर हा सामना झाला. मध्यंतरास गोलशून्य बरोबरी होती. 85व्या मिनिटाला आघाडी फळीतील डेव्हिड विल्यम्सने मध्य क्षेत्रात उजवीकडून चाल रचली. त्याचा पास मिळाला तेव्हा जमशेदपूरचा बचावपटू पीटर हार्टली याचे दडपण असूनही कृष्णाने गोल केला.
बाद फेरीतील प्रवेश यापूर्वीच निश्चीत केलेल्या एटीकेएमबीने 17 सामन्यांत 11वा विजय मिळविला असून तीन बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 36 गुण झाले. त्यांनी मुंबई सिटी एफसीला दोन गुणांनी मागे टाकले. मुंबई सिटीचा एक सामना अद्याप बाकी आहे. 16 सामन्यांतून दहा विजयांसह 34 गुण अशी मुंबई सिटीची कामगिरी आहे.
जमशेदपूरला 18 सामन्यांत सातवा पराभव पत्करावा लागला. पाच विजय व सहा बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 21 गुण व सहावे स्थान कायम राहिले. या पराभवामुळे जमशेदपूरच्या बाद फेरीच्या आशा संपुष्टात आल्यात जमा आहेत.
सातव्या मिनिटाला जमशेदपूरचा बचावपटू पीटर हार्टली याने एटीकेएमबीचा स्ट्रायकर रॉय कृष्णा याला गोलक्षेत्रात डावीकडे पाडले. त्यावेळी डेव्हिड विल्यम्सने कृष्णाच्या दिशेने पास दिला होता. कृष्णाने पेनल्टीसाठी अपील केले, पण रेफरी हरीश कुंडू यांनी कॉर्नर बहाल केला. त्यावर काही घडले नाही.
12व्या मिनिटाला जमशेदपूरचा मध्यरक्षक ऐतोर मॉनरॉय याने उजवीकडे मिळालेली फ्री किक घेतली. समोर एकटा कृष्णा उभा असूनही चेंडू त्याला लागला. रेफरींनी शिट्टी फुंकल्यानंतर कृष्णा जागचा हालल्याचा दावा मॉनरॉयने केला.
22व्या मिनिटाला जमशेदपूरचा मध्यरक्षक अलेक्झांड्रे लिमा याने पेनल्टी क्षेत्राबाहेर डावीकडे चेंडूवर ताबा मिळविला. त्याने मध्य फळीतील सहकारी सैमीनलेन डुंगल याला क्रॉस पास दिला. डुंगलने हेडिंग केले, पण प्रतिस्पर्धी बचावपटू शुभाशिष बोस याच्या दडपणामुळे तो अचूकता साधू शकला नाही.
25व्या मिनिटाला एटीकेएमबीचा स्ट्रायकर डेव्हिड विल्यम्स याने डावीकडून चाल रचली. त्याने बोसला पास दिला. बोसने कृष्णाच्या दिशेने चेंडू मारला, पण कृष्णा चेंडूवर नियंत्रण मिळवू शकला नाही.
28व्या मिनिटाला एटीकेएमबीचा बचावपटू संदेश झिंगन याचा क्रॉस शॉट जमशेदपूरचा बचावपटू रिकी लल्लावमाव्मा याने बाहेर घालविला. त्यामुळे एटीकेएमबीला कॉर्नर मिळाला. स्ट्रायकर मार्सेलिनियो याने मारलेला चेंडू जमशेदपूरचा गोलरक्षक टी. पी. रेहेनेश याने थोपविला.
महत्त्वाच्या बातम्या –
आयएसएल २०२०-२१ : ओदीशाला हरवून नॉर्थईस्ट तिसऱ्या स्थानी
आयएसएल २०२०-२१ : सुपर सब इशानमुळे गोव्याने चेन्नईयीनला रोखले
ऐतिहासिक! सोशल मीडियावर ५०० मिलियन फॉलोअर्स असणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो जगातील पहिलाच खेळाडू