बेंगळुरूविरुद्ध प्रतीआक्रमण रचत एटीके अंतिम फेरीत

कोलकता। हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) सहाव्या मोसमात दोन वेळच्या माजी विजेत्या एटीकेने गतविजेत्या बेंगळुरू एफसीविरुद्ध यशस्वी प्रतिआक्रमण रचत अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीतील दुसऱ्या टप्यात घरच्या मैदानावर 3-1 अशा विजयासह एटीकेने आव्हान राखले. 3-2 अशा ऍग्रीगेटसह एटीकेने आगेकूच केली. आता त्यांची लढत येत्या शनिवारी (दिनांक 14 मार्च) चेन्नईयीन एफसीविरुद्ध गोव्यात होईल.

एटीकेला पहिल्या टप्यात बेंगळुरूविरुद्ध एकमेव गोलने पराभूत व्हावे लागले होते. दुसऱ्या टप्यात एटीकेचा संघ पाचव्याच मिनिटाला पिछाडीवर पडला. त्यामुळे त्यांच्यावर दडपण आले होते, पण एटीकेने 50 हजार 102 प्रेक्षकांच्या साक्षीने स्पेनचे प्रशिक्षक अँटोनिओ हबास यांच्या मार्गदर्शनाखाली दमदार खेळ केला. रॉय कृष्णाने बरोबरी साधून दिल्यानंतर डेव्हिड विल्यम्स याने पेनल्टीसह दोन गोल केले. त्यामुळे कार्लेस कुआद्रात यांच्या बेंगळुरू संघाची निराशा झाली. घरच्या मैदानावर आघाडी घेऊन आणि मग प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर आधी खाते उघडूनही बेंगळुरू फायदा उठवू शकला नाही.

विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर यजमान एटीकेला पाचव्याच मिनिटाला धक्का बसला. बेंगळुरूचा बचावपटू फ्रान्सिस्को बोर्जेस याने मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळवित प्रतिआक्रमण रचले. त्याने उजवीकडून घोडदौड करणारा आघाडी फळीतील सहकारी आशिकला पास दिला. आशिकने मग एटीकेचा बचावपटू सुमित राठी याला चकवून गोल क्षेत्रात मुसंडी मारली. मग त्याने एटीकेचा गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य याला यशस्वी शह देत गोल नोंदविला.

फिजीचा खेळाडू रॉय कृष्णा याने एटीकेला 30व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली. आघाडी फळीतील सहकारी डेव्हिड विल्यम्स याच्या क्रॉस पासवर त्याने उजवीकडून शानदार फिनिशींग केले. मध्यंतरास 1-1 अशी बरोबरी कायम होती.

एका तासाच्या खेळानंतर बेंगळुरूचा सुरेश वांगजाम याने गोलक्षेत्रात एटीकेच्या विल्यम्सला पाडले. त्यामुळे एटीकेला पेनल्टी बहाल करण्यात आली. ती सत्कारणी लावताना विल्यम्सने बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याचा बचाव भेदण्याचा पराक्रम केला.

विल्यम्सनेच 79व्या मिनिटाला एटीकेला एकूण लढतीत प्रथमच आघाडी मिळवून दिली. बचावपटू प्रबीर दास याने रचलेल्या चालीवर त्याने सफाईदार हेडिंगवर लक्ष्य साधले.

अंतिम टप्यात बेंगळुरूला डिमास डेल्गाडो याचे फ्री कीकवरील कौशल्य तारू शकले नाही. एटीकेचा गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य याला बचाव फळीतील सहकाऱ्यांनी चिवट साथ दिली. त्यामुळे एटीकेचे नेट सुरक्षित राहिले.

उपांत्य निकाल :
दुसरा टप्पा
एटीके : 3 (रॉय कृष्णा 30, डेव्हिड विल्यम्स 63-पेनल्टी, 79) विजयी विरुद्ध बेंगळुरू एफसी : 1 (आशिक कुरुनीयन 5)

पहिला टप्पा
एटीके : 0 पराभूत विरुद्ध बेंगळुरू एफसी : 1

ऍग्रीगेट
एटीके : 3 विजयी विरुद्ध बेंगळुरू एफसी : 2

You might also like