वेस्टइंडीज आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात मिशेल स्टार्क आणि जोश हेझलवुड यांच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजवर धुव्वादार विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला डकवर्थ लुईस पद्धतीच्या आधारे 133 धावांच्या मोठ्या फरकाने हरवले आहे. पावसामुळे हा सामना 49 षटकांचा खेळला गेला होता.
ऑस्ट्रेलियाचे 49 षटकांत 252 धावा करत 9 गडी बाद झाले होते. पण, डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजला 49 षटकांत 257 धावांचे लक्ष्य मिळाले होते. याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिज संघाला 26.2 षटकांत 123 धावांवरच गुंडाळले. आता दोन्ही संघांमधील मालिकेचा दुसरा सामना शुक्रवारी(23 जुलै) रंगणार आहे.
या सामन्यात 257 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर आलेल्या वेस्ट इंडीजच्या फलंदाजानी क्रिकेटप्रेमींना खूप निराश केले. वेस्टइंडीज संघाचे 6 गडी फक्त 27 धावांवर बाद झाले. मिशेल स्टार्क आणि जोश हेजलवुड यांनी मिळून वेस्ट इंडिजची वरची फळी बाद केली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर मिचेल स्टार्कने इव्हिन लुईसचा झेल घेत वेस्ट इंडिजला मोठा धक्का दिला. त्यानंतर तिसर्या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने जेसन मोहम्मदला यष्टीचीत करत वेस्ट इंडिजला दुसरा झटका दिला.
वेस्ट इंडिज संघाला हेझलवूडने तिसरा धक्का दिला, तो म्हणजे शिमरोन हेटमायरला आपल्याच चेंडूवर झेलबाद करत. पुढे स्टार्कने निकोलस पूरनला खातेही उघडू दिले नाही आणि पायचीत करत तंबूत पाठवले. त्यानंतर ड्वेन ब्राव्होला मार्शच्या हातामध्ये झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर हेजलवुडने जेसन होल्डरला शून्यावर झंपाच्या हातून झेलबाद करत वेस्ट इंडिजची सहावी विकेट घेतली.
पोलार्डने संघाची लाज वाचविली
स्टार्क आणि हेझलवुडमुळे वेस्ट इंडिजचा संघ 50 धावांमध्येच सर्वबाद होईल, असे सर्वांना वाटत होते. त्यानंतर कर्णधार कायरन पोलार्डने चांगली फलंदाजी करत डाव सावरला. पोलार्डने अल्झरी जोसेफच्या मदतीने सातव्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. मिचेल मार्शने अखेर जोसेफला त्रिफळाचीत करुन ही भागीदारी मोडीत काढली.
वेस्ट इंडिजची धावसंख्या 98 धावांवर पोहचल्यानंतर स्टार्कने वेस्ट इंडिजला दुहेरी झटका दिला. त्याने टर्नरच्या हातून पोलार्डला झेलबाद केले आणि अकील हुसेनला खाते न उघडू देताच पायचीत करून परत पाठवले. यानंतर हेडन वॉल्श बाद झाल्याने विंडीजचा डाव संपला. झंपाने त्याला झेलबाद केले.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. जोश हेजलवुडने 3 विकेट्स घेतल्या. अॅडम झांपा आणि मिचेल मार्शच्या खात्यात एक विकेट आली. हा पराभव वेस्ट इंडीजसाठी लाजिरवाणा होता. कारण त्यांच्यातील फक्त चार फलंदाज दुहेरी धावा करू शकले. तर तीन फलंदाजांनी खातेही उघडले नव्हते.
कॅरीने उत्कृष्ट खेळी केली
तत्पुर्वी, ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये जोश फिलिप आणि बेन मॅकडर्मोट यांनी 51 धावांच्या भागीदारीसह संघाला जोरदार सुरुवात करून दिली. फिलिपला यष्टीचीत करत हुसेनने ही भागीदारी मोडली. त्यानंतर जोसेफने मिशेल मार्शचा झेल पूरणच्या हातामध्ये देत संघाला दुसरा झटका दिला. मोसेस हेनरिक्स जोसेफच्या हाती झेल देत बाद झाला. पुढे जोसेफने बेन मॅकडर्मॉटला आपला दुसरा शिकार बनवले.
यानंतर अलेक्स कॅरी आणि ऍश्टन टर्नर पाचव्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी करुन ऑस्ट्रेलिया संघाला 200 धावांपर्यंत घेऊन गेले. कॅरीने 87 चेंडूंत पाच चौकार व दोन षटकारांच्या मदतीने 67 धावांची खेळी केली. टर्नरने 45 चेंडूंमध्ये दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 49 धावा केल्या. परंतु, या दोघांची विकेट गेल्यानंतर उर्वरित फलंदाज मोठ्या आकडी धावा करू शकले नाहीत. परिणामी ऑस्ट्रेलियाने 9 गडी गमावत 252 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजकडून हेडन वॉल्शने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तानी दिग्गजाने आपल्याच देशाच्या फलंदाजांचे टोचले कान; म्हणे, ‘चाहरकडून काही तरी शिका’