मार्च महिन्यात आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय मालिका खेळलेला भारतीय क्रिकेट संघ या महिन्याअखेरीस पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. भारतीय संघाच्या लांबलचक ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील या ‘हाय प्रोफाईल’ दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचे कौतुक केले आहे.
“मी पाहिलेला सर्वोत्कृष्ट खेळाडू”
एकदिवसीय व टी२० मालिकेनंतर, १७ डिसेंबरपासून ऍडलेड येथील सामन्याने, ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. हा पहिला कसोटी सामना दिवस-रात्र स्वरूपात खेळवला जाईल. या सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली कौटुंबिक कारणाने मायदेशी परतणार आहे. कोहलीच्या नसण्याने ऑस्ट्रेलिया संघाला फायदा होईल, असे अनेक समीक्षकांचे मत आहे.
यावर ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी आपली प्रतिक्रिया मांडताना म्हटले, “विराट हा मी आतापर्यंत पाहिलेला सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. मी केवळ त्याच्या फलंदाजीचा नव्हेतर त्याच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाचा मोठा प्रशंसक आहे. त्याचा उत्साह आणि खेळाप्रतीची समर्पणाची भावना मला खूप आवडते.”
लँगर पुढे म्हणाले,”विराट नसण्याने इतकेही खूश होण्याची गरज नाही. विराटचा प्रतिस्पर्ध्यावर वेगळा प्रभाव असतो. मात्र, भारताचा इतर संघ ही तितकाच ताकदवान आहे. भारताने मागील मालिकेत आमचा पराभव केला होता, हे विसरून चालणार नाही.”
ऑस्ट्रेलियात विराटने केली आहे दमदार कामगिरी
विराटने आतापर्यंत आपल्या कसोटी कारकिर्दीत तीन वेळा ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आहे. या तीनही वेळी तो धावा जमवण्यात यशस्वी ठरला होता. २०११-१२ च्या दौऱ्यावर तो भारताकडून शतक ठोकणारा एकमेव फलंदाज होता. २०१४-२०१५ दौऱ्यावेळी चार सामन्यात ६९२ धावा विराटच्या नावे जमा होत्या. २०१८-२०१९ दौऱ्यातही तो जवळपास ३०० धावा काढण्यात यशस्वी ठरलेला. विराटच्याच नेतृत्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करण्याची कामगिरी पहिल्यांदाच केली होती.
स्मिथ आणि वॉर्नरचे असेल आव्हान
मागील दौऱ्यापेक्षा यावेळी भारतीय संघासमोर वेगळी आव्हाने असणार आहेत. २०१८-२०१९ दौऱ्यावेळी ऑस्ट्रेलिया संघात समाविष्ट नसलेले स्टीव्ह स्मिथ व डेविड वॉर्नर हे प्रमुख फलंदाज यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघात सामील आहेत. भारतीय कर्णधार विराट कोहली मायदेशी परतल्यानंतर, अजिंक्य रहाणे भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे. विराटने पालकत्व रजा घेतल्याने तो कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळल्यानंतर भारतात परतणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“विराट कसोटी मालिकेत नसणे हे निराशाजनक, परंतु तरीही भारताकडे सुपरस्टार्स आहेत”
संघ महत्त्वाचा की कुटुंब? विराटने पालकत्व रजा घेतल्याने चाहत्यांमध्ये पडले दोन गट
ट्रेंडिंग लेख –
-विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय
ज्याच्या गोलंदाजीवर जखमी होत फिलीप ह्युजेस देवाघरी गेला, तोच गोलंदाज भारताविरुद्ध करतोय पदार्पण
रामराम आणि पुन्हा भेटू! आयपीएल २०२० ला अलविदा करत असताना एक नजर या स्पर्धेतील महत्वाच्या घटनांवर