ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने पुष्टी केली आहे की, तो भारताविरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलिया संघ फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात चार सामन्यांची ही कसोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीला नागपूरमध्ये सुरू होणार आहे. त्याआधीच मिचेल स्टार्कच्या दुखापतीविषयी ही महत्वाची माहिती मिळाली.
मिचेल स्टार्क (Mitchell Starc) भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून माघार घेण्याच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरूच होत्या. अशात आता स्टार्कने स्वतः पुष्टी केल्याने या प्रश्नाचे उत्तर चाहत्यांना मिळाले. ऑस्ट्रेलिया संघाचा हा प्रमुख वेगवान गोलंदाज बोटाला झालेल्या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे (26 डिसेंबर) कसोटी सामन्यात स्टार्कच्या डाव्या हाताचे बोट दुखावले गेले होते. याच कारणास्तव स्टार्क आफ्रिकी संघाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात देखील खेळू शकला नव्हता.
स्टार्कला त्याच्या फिटनेसविषयी प्रश्न विचारल्यानंतर तो म्हणाला, “मी पूर्णपणे ठीक होण्याच्या मार्गावर आहे. अजूनही काही आठवडे लागतील. त्यानंतर शक्यतो दिल्लीमध्ये संघातील खेळाडूंशी भेट होऊ शकेल. आशा आहे संघ आपला पहिला कसोटी सामना जिंकून दिल्लीमध्ये पोहोचेल.” दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान नागपूरमध्ये खेळला जाणार आहे. त्यानंतर उभय संघांतील दुसरा कसोटी सामना 17 ते 21 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीमध्ये खेळला जाईल.
मिचेल स्टार्क पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार असला तरी ऑस्ट्रेलियन संघाकडे त्याची जागा भरून काढण्यासाठी एक चांगला युवा गोलंदाज आहे. त्यांचा युवा खेळाडू लान्स मॉरिस भारताविरुद्ध पदार्पण करू शकतो आणि स्टार्कची जागाही भरून काठू शकतो. स्टार्कव्यतिरिक्त त्यांचा फलंदाजी अष्टपैलू कॅमरून ग्रीन (Cameron Green) देखील दुखापतग्रस्त आहे. अशात त्याच्या खेळण्याबाबत देखील संभ्रम आहे. कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ भारताला रवाना होण्यापूर्वी ग्रिनने फिटनेस सिद्ध केली, तर त्याला संघात सामील केले जाईल, असेही सांगितले जात आहे.
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ:
पॅट कमिंस (कर्णधार), एश्टन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरून ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, लांस मॉरिस, टोड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ (उपकर्णधार), मिशेल स्टार्क, मिशेल स्वेपसन, डेविड वार्नर.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे (बॉर्डर गावसकर ट्रॉफी) वेळापत्रक
9-13 फेब्रुवारी – पहिला कसोटी सामना
17-21 फेब्रुवारी – दुसरा कसोटी सामना
1-5 मार्च – तिसरा कसोटी सामना
9-13 मार्च – चौथा कसोटी सामना
(Australian fast bowler Mitchell Starc will not play in Nagpur Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“युवा खेळाडूंनी धोनीकडून शिकावे”, माजी प्रशिक्षकाने दिला मोलाचा सल्ला
IND vs AUS | पहिल्या कसोटीत पदार्पण करू शकतो ‘हा’ ऑसी वेगवान गोलंदाज, खेळपट्टीविषयी दिली खास प्रतिक्रिया