बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 चा चौथा कसोटी सामना अतिशय रोमांचक वळणावर आहे. चौथ्या दिवशी भारतानं ऑस्ट्रेलियावर आपली पकड पूर्णपणे मजबूत केली. दरम्यान, या कसोटी सामन्याच्या मध्यावर ऑस्ट्रेलियन संघासमोर एक मोठं संकट उभं ठाकलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज जोश इंग्लिस बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी आणि पुढील कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. तो मेलबर्न येथे सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत पर्यायी खेळाडू म्हणून मैदानात उतरला होता. मात्र त्याच्या पायाचा स्नायू ताणल्या गेला. त्यामुळे तो या मालिकेतून बाहेर पडला आहे.
या दुखापतीनंतर ऑस्ट्रेलियन संघासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. सध्या संघात जोश इंग्लिस हा एकमेव अतिरिक्त फलंदाज होता, कारण अष्टपैलू ब्यू वेबस्टरला बिग बॅश लीगमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आली होती. आता ऑस्ट्रेलियाला सिडनी येथे होणाऱ्या पाचव्या कसोटीसाठी संघात अतिरिक्त फलंदाज समाविष्ट करण्याचा विचार करावा लागेल.
जोश इंग्लिसनं या कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी दरम्यान पर्थ स्कॉर्चर्ससाठी दोन बिग बॅश लीग सामने खेळले आणि नंतर राष्ट्रीय संघात पुनरागमन केलं. इंग्लिस बाहेर पडल्यानं आता नॅथन मॅकस्विनीला संघात परत बोलावण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. या कसोटीपूर्वी सॅम कॉन्स्टासला मॅकस्विनीच्या जागी संघात संधी मिळाली होती. परंतु आता त्याला पुन्हा संघात संधी मिळू शकते.
आता जोश इंग्लिसचं पुढील लक्ष्य श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघात पुनरागमन करण्याकडे असेल. फिरकी गोलंदाजीविरुद्धचं त्याचं कौशल्य श्रीलंकेत ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतं. ऑस्ट्रेलियन संघ 29 जानेवारी रोजी गॅले येथे पहिली कसोटी खेळण्यापूर्वी यूएईमध्ये प्री-टूर कॅम्प आयोजित करेल.
हेही वाचा –
जसप्रीत बुमराहचा कहर, 51 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाची मधली फळी 16 धावांत गडगडली
नक्की कॅप्टन आहे कोण? विराट की रोहित? पाहा व्हिडीओ काय म्हणतोय!
WTC फायनलच्या उंबरठ्यावर दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान पलटवार करणार?