भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर असून त्यांचा सध्या काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाविरुद्ध तीन दिवसीय सराव सामना सुरु आहे. या सामन्यादरम्यान भारताला मोठा धक्का बसला आहे. या दौऱ्यावर राखीव खेळा़डू म्हणून गेलेला आवेश खान सराव सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे आता तो आगामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही बाहेर जाण्याची शक्यता आहे.
इएसपीएनने दिलेल्या वृत्तानुसार येत्या आठवड्यात आवेश खानच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचे काही स्कॅन आणि टेस्ट करण्यात येतील. त्यानंतर त्याला भारतात परत पाठवण्यात येईल, जेणेकरुन तो उर्वरित आयपीएल २०२१ हंगामासाठी तंदुरुस्त होईल. आयपीएलमध्ये आवेश दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो. त्याने आयपीएल २०२१ स्थगित होण्यापूर्वी १४ विकेट्स घेतल्या होत्या.
खरंतर या सामन्यापूर्वी काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाचे काही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आल्याने अनिवार्य क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहेत. त्याचमुळे काउंटी संघाने त्यांचा अंतिम ११ जणांचा संघ तयार करण्यासाठी भारतीय संघाकडे काही खेळाडूंची मागणी केली होती. त्यानुसार या सराव सामन्यात वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान हे दोन भारतीय खेळाडू काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाकडून खेळत आहेत. पण आता आवेश दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर झाला आहे.
हनुमा विहारीच्या शॉटने दुखापत
या सराव सामन्यात भारताकडून फलंदाजी करत असताना हनुमा विहारीने मारलेल्या एका शॉटचा चेंडू आडवताना आवेश खानच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले. त्यामुळे त्याला लगेचच सामन्यातून बाहेर करण्यात आले. याबद्दल बीसीसीआयनेही माहिती दिली होती. बीसीसीआयने सांगितले आहे की सध्या त्याच्यावर त्यांचे वैद्यकिय पथक लक्ष ठेवून आहे.
शुबमन गिलच्या सहभागावरही प्रश्नचिन्ह
इंग्लंड दौऱ्यात भारताला ४ ऑगस्टपासून कसोटी मालिका खेळायची आहे. पण त्यापूर्वी भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिलच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह आहे. गिललाही डाव्या पायाला दुखापत झाली असल्याने तो या मालिकेतून बाहेर जाण्याची शक्यता दाट आहे. तरी, अजून बीसीसीआयने त्याच्या दुखापतीबाबत कोणतीही माहिती स्पष्ट केलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! ऑलिंपिक २०३२ चे आयोजन होणार ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ शहरात, आयओसीची घोषणा
Video: लाईव्ह सामन्यात भिडले प्रतिस्पर्धी संघ अन् केली बेदम मारहाण, काहींनी तर बॅटने दिला चोप