भारत आणि इंग्लंड यांचादरम्यान चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना दुसऱ्याच दिवशी संपन्न झाला. दिवस-रात्र स्वरूपाचा हा सामना अहमदाबादच्या पुनर्बांधणी केलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (पूर्वीचे मोटेरा स्टेडियम) खेळला गेला. भारतीय संघाने दोन दिवसांच्या आतच दहा गड्यांनी विजय साजरा करत, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याकडे एक पाऊल टाकले. या सामन्यात भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला ११ बळी मिळवणारा ‘लोकल बॉय’ अक्षर पटेल.
दमदार कसोटी पदार्पण
भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा भाग असलेल्या अक्षरने याच मालिकेतून कसोटी पदार्पण केले. चेन्नई येथील दुसऱ्या सामन्यात त्याने पहिल्या डावात दोन तर दुसर्या डावात पाच इंग्लिश फलंदाजांना बाद करत कसोटी कारकिर्दीची देखणी सुरुवात केली. त्याला दुसरा सामना आपले घरचे मैदान असलेल्या अहमदाबाद येथे खेळायला मिळाला. तेव्हा, या कसोटीच्या पहिल्या डावात अक्षरने ६ बळी घेऊन इंग्लंडचा डाव ११२ धावात संपुष्टात आणण्यात सिंहाचा वाटा उचलला. तसेच, दुसऱ्या डावातही ५ बळी घेत त्याने भारताला विजयाच्या दिशेने नेले. सामन्यातील ११ बळींमुळे त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.
बाराव्या वर्षी घेतला क्रिकेट खेळण्याचा निर्णय
अक्षर पहिल्यापासून अभ्यास आणि खेळ या दोन्ही बाबींमध्ये पुढे होता. त्याचे क्रिकेट खेळणे त्याच्या वडिलांना आवडे. मात्र, आईचा विरोध होता. तिला वाटे की, आपल्या मुलाला दुखापत होऊ नये. जेव्हा सर्व कुटुंबासमक्ष त्याला क्रिकेट की अभ्यास यापैकी निवड करण्याविषयी विचारण्यात आले तेव्हा त्यांनी क्रिकेटची निवड केली. तेव्हा अक्षरचे वय फक्त १२ वर्ष होते.
अक्षर नावामागची कहाणी
अक्षर हे नाव तो पहिले Akshar असे लिहित. मात्र, भारताच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेटसंघात त्याची निवड झाल्यानंतर पासपोर्ट काढण्यासाठी त्याला शाळा सोडल्याचा दाखला हवा होता. त्यावेळी, त्या दाखल्यावर शाळेच्या मुख्याध्यापकांनी Axar असे नाव लिहिले. पुढे, त्याने हेच नाव कायम करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या काही सोशल मीडिया खात्यांवर मात्र Akshar असेच लिहिलेले आढळते.
वडिलांना मृत्यूच्या दाढेतून घेऊन आला परत
अक्षर आपल्या वडिलांच्या अत्यंत जवळ आहे. त्यांनीच त्याला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा दिली होती. दोन वर्षांपूर्वी आपल्या काही मित्रांसोबत फिरायला गेल्यानंतर अक्षरच्या वडिलांचा अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या डोक्याच्या डाव्या बाजुला गंभीर दुखापत झाली होती. मात्र, या कठीण काळात सर्वात लहान असणाऱ्या अक्षरने जबाबदारी घेत अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळून वडिलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. वडीलांना परदेशात उपचारास घेऊन जाण्याची देखील त्याची तयारी होती. परंतु, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना यश आले व त्याचे वडील पूर्णता ठणठणीत झाले.
अशी राहिली आहे आंतरराष्ट्रीय कारकीर्द
सध्या २७ वर्षांच्या असलेल्या अक्षरने २०१४ साली वनडे सामन्यातून भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याने भारताकडून आत्तापर्यंत ३८ वनडे सामने खेळताना ४५ बळी मिळवले आहेत. तर, ११ टी२० सामन्यात त्याने ९ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. २०१५ वनडे विश्वचषकासाठीच्या संघात त्याची निवड झाली होती. परंतु, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. कसोटी कारकिर्दीची देखील चमकदार सुरुवात करत त्याने पहिल्या दोन सामन्यातच १८ बळी आपल्या नावे केले आहेत.
नाडियाडचा जयसूर्या ते अहमदाबादचा हिरो
अक्षरचे शहर नाडियाड हे अहमदाबादपासून ६० किलोमीटरच्या अंतरावर आहे. अक्षरने आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात नाडियाडमधूनच केली. त्याची आक्रमक फलंदाजी आणि डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करण्याच्या कौशल्यामुळे त्याला ‘नाडियाडचा जयसूर्या’ असे म्हटले जाई. चेन्नई कसोटीवेळी भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत याने त्याला जयसूर्या म्हटल्याचे स्टंप माइकमध्ये ऐकू आले होते. आज याच अक्षरने अफाट मेहनत करत ‘नाडियाडचा जयसूर्या’ ते ‘अहमदाबादचा हिरो’ होण्यापर्यंतचा प्रवास केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
वहिनी आल्या, तेही लाडक्या परीला घेऊन!! विराटला चीयर करण्यासाठी अनुष्कासह वामिकाही अहमदाबादमध्ये दाखल
INDvsENG: गोलंदाजीने इंग्लिश फलंदाजांच्या आणली नाकी नऊ, ठरला सामनावीर; तरीही का निराश आहे अक्षर?