ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीगच्या १० व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या ७ व्या सामन्यात चाहत्यांना तुफानी खेळीचे दर्शन झाले. हा सामना ब्रिसबेन हीट आणि सिडनी थंडर या संघांमध्ये झाला. हा सामना सिडनी संघाने ४ विकेट्सने जिंकला. या विजयाचा नायक युवा अष्टपैलू डॅनियल सॅम्स ठरला. त्याने अवघ्या २५ चेंडूत ३ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ६५ धावा ठोकल्या. त्याच्या या खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले.
नाणेफेक जिंकत ब्रिसबेन संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना ब्रिसबेनने ६ विकेट्स गमावत १७८ धावा केल्या होत्या. हे आव्हान सिडनीने १८.५ षटकामध्येच पूर्ण केले.
विशेष म्हणजे या सामन्यात सिडनीने आव्हानाचा पाठलाग करताना आपले ५ विकेट्स ८० धावांवरच गमावल्या होत्या. परंतु तरीही ब्रिसबेनला पराभूत करण्यात सिडनी संघाला यश आले.
सॅम्सची तुफानी खेळी
ब्रिसबेन संघाने दिलेल्या १७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सिडनीची सुरुवात खूपच निराशाजनक राहिली. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर ऍलेक्स हेल्स शून्य धावेवर पव्हेलियनच्या दिशेने मार्गस्थ झाला. कर्णधार कॅलम फर्ग्युसनलाही धावा काढता आल्या नाहीत. तोही पहिल्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शून्यावरच तंबूत परतला. यानंतर उस्मान ख्वाजा आणि ऍलेक्स रॉसने वेगवान फटकेबाजी केली. परंतु ख्वाजाही गोलंदाज जॅक विल्डरमथच्या गोलंदाजीवर बाद झाला.
पुढे रॉस (३४), बॅक्स्टर हॉल्ट (२३) आणि बेन कटिंगने (२९) धावा केल्या. परंतु तरीही ब्रिसबेन संघ सिडनी संघावर आपले वर्चस्व दाखवताना दिसली. परंतु यानंतर सिडनी संघाला सुखद धक्का बसणार होता. कारण धडाकेबाज फलंदाज डॅनियल सॅम्स फलंदाजीला आला. त्याने जबरदस्त फटकेबाजी करत अवघ्या २३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने अर्धशतक ठोकताना ३ चौकार आणि ५ षटकारांचा पाऊस पाडला. यानंतर सॅम्सने आणखी दोन षटकार ठोकले.
बेन लाफलिनच्या गोलंदाजीवर सॅम्सची फटकेबाजी
सॅम्सने बेन लाफलिनच्या षटकात तब्बल ४ षटकार ठोकत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या दोन षटकात सिडनी संघाला २४ धावांची आवश्यकता होती. आणि ब्रिसबेनचा कर्णधार ख्रिस लीनने गोलंदाजी करण्याची जबाबदारी लाफलिनवर सोपवली होती. परंतु लिनचा हा निर्णय संघाच्या अंगलट आला.
Incredible! Daniel Sams hits four sixes off the penultimate over to seal a remarkable comeback win for the Thunder! #BBL10 pic.twitter.com/06tfOInTeB
— cricket.com.au (@cricketcomau) December 14, 2020
लाफलिनने पहिल्याच चेंडूवर नो बॉल टाकला. यावर सॅम्सने षटकार ठोकला. त्यानंतर सॅम्सने लाफलिनच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. चौथ्या चेंडूवर सॅम्सने काऊ कॉर्नरवर षटकार खेचला आणि यानंतर पाचव्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हर्सच्या वरून षटकार ठोकत संघाला ७ चेंडू शिल्लक ठेवत विजय मिळवून दिला.
विशेष म्हणजे सॅम्सने गोलंदाजी करतानाही चमकदार कामगिरी केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ३२ धावा देत २ विकेट्स आपल्या खिशात घातल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
IndvsAus: वाक् युद्धाला झाली सुरुवात; ‘या’ भारतीय खेळाडूने दिला ऑस्ट्रेलियन संघाला इशारा
“रहाणेवर कर्णधारपदाचा दबाव नसेल”; भारताच्या दिग्गजाचे प्रतिपादन
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंडची झेप; भारताची वाट झाली अवघड