अँटिग्वा। शनिवारी (५ फेब्रुवारी) रात्री उशीरा भारतीय क्रिकेटसाठी सर्वात आनंदाची बातमी आली, ती म्हणजे भारताच्या युवा संघाने १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकल्याची. भारताच्या युवा संघाने अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव करत १९ वर्षांखालील विश्वचषकावर (U19 World Cup)आपले नाव कोरले. हा भारताने पाचव्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकण्याचा कारनामाही केला. या विक्रमी विश्वविजेतेपदानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) संपूर्ण १९ वर्षांखालील भारतीय संघाकरता बक्षीस म्हणून रोख रक्कम जाहीर करण्यात आली आहे.
बीसीसीआयने (BCCI) याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार वेस्ट इंडिज येथे झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक २०२२ विजेत्या भारतीय संघातील प्रत्येक सदस्यांला बक्षीस म्हणून रोख रक्कम मिळणार आहे. भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला ४० लाख रुपये बक्षीस रक्कम मिळेल, तर भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील प्रत्येक सदस्यांला २५ लाख रुपये बक्षीस रक्कम मिळेल.
बीसीसीआयकडून संघाचे कौतुक
बक्षीस रक्कम घोषित करण्याबरोबरच बीसीसीआयने यश धूलच्या नेतृत्त्वातील १९ वर्षांखालील भारतीय संघाचे कौतुक देखील केले आहे. तसेच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव जय शाहसह इतर अधिकाऱ्यांनीही भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.
NEWS – The BCCI has announced cash rewards for the victorious India U19 team. The following is the breakdown of prize money –
Members of India U19 team – INR 40 lakhs each.
Members of the Support Staff, India U19 – INR 25 lakhs each.More details here – https://t.co/ySaGBQxVt4 pic.twitter.com/v0Wxi4RlZg
— BCCI (@BCCI) February 6, 2022
भारताचे विक्रमी विजेतेपद
भारतीय संघाचे हे १९ वर्षांखालील विश्वचषकातील पाचवे विजेतेपद होते. यापूर्वी भारतीय संघाने २००० साली मोहम्मद कैफच्या नेतृत्त्वाखाली, २००८ साली विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली, २०१२ साली उन्मुक्त चंदच्या नेतृत्त्वाखाली आणि २०१८ साली पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वाखाली १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला आहे. त्यामुळे भारत या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ ठरला आहे.
वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या या विश्वचषकात भारतीय संघ अपराजित राहिला. गट साखळीपासून ते अंतिम सामन्यापर्यंत भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसला नाही. या विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक धावा अंगक्रिश रघूवंशीने केल्या. त्याने २७८ धावा केल्या. तसेच विकी ओत्सवालने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने या स्पर्धेत एकूण १२ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाचा १००० वा वनडे! वाचा जलद शतक ते सर्वोत्तम गोलंदाजी पर्यंतची वनडे इतिहासातील खास आकडेवारी
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेत टीम इंडियाने ‘अशाप्रकारे’ लता मंगेशकर यांना वाहिली श्रद्धांजली