टी-20 विश्वचषक 2022 चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंडमध्ये खेळला गेला. भारतीय संघाला या सामन्यात 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर भारत विश्वचषकातून बाहेर पडला असून, खेळाडू व संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका होताना दिसतेय. कर्णधार रोहित शर्मा व प्रशिक्षक राहुल द्रविड हे प्रामुख्याने टीकाकारांच्या निशाण्यावर आहेत. तसेच आता भारतीय क्रिकेटमध्ये बदलाचे वारे देखील लवकरच वाहणार असल्याचे बोलले जातेय. त्याच पार्श्वभूमीवर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक निर्णय घेतला आहे.
भारतीय संघ विश्वचषकातून बाहेर गेल्यानंतर अनेक अनुभवी खेळाडूंना टी20 संघातून वगळण्याची मागणी होतेय. सध्या सोशल मीडियावर याची चर्चा असली तरी, बीसीसीआयने याबाबत आता पहिले पाऊल टाकले आहे.
अद्याप भारतीय संघ ऑस्ट्रेलियात आहे. त्यानंतर या संघातील काही खेळाडू न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना होतील. त्याचवेळी अनुभवी खेळाडू मायदेशी परतणार आहेत. भारतीय खेळाडू माघारी परतल्यानंतर बीसीसीआय एका बैठकीचे आयोजन करणार असल्याचे वृत्त समोर येतेय.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार,
“बीसीसीआय लवकरच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार व वरिष्ठ फलंदाज विराट कोहली व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासमवेत भारतीय क्रिकेटच्या भविष्याबाबत चर्चा करणार आहे. पुढील चार वर्षात भारतीय संघ कोठे असेल याबाबत पूर्ण योजना यातून आखली जाईल. या बैठकीचे प्रमुख बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी असतील.”
सध्या भारतीय संघ द्विपक्षीय मालिकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत असला तरी, आयसीसी स्पर्धांमध्ये संघाला सातत्याने अपयश येत आहे. 2013 चॅम्पियन ट्रॉफीनंतर भारताला कोणतीही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही. ( BCCI Inviting Meeting With Rohit Virat And David For Future)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
करोडोंची फी घेऊनही द्रविड देऊ शकला नाही रिझल्ट! वाचा वर्षभरातील कामगिरी
‘बिलियन डॉलर इंडस्ट्रीचा संघ मागेच राहिला अन् आम्ही…’, पीसीबी अध्यक्षांनी भारताच्या जखमेवर चोळलं मीठ