fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

आजपर्यंत केवळ ‘या’ ३ क्रिकेटर्सला मिळाला आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

मुंबई । बीसीसीआयने भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा यांची खेलरत्न या पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.

मागील विश्वचषकात त्याने दमदार फलंदाजी करत पाच शतके ठोकून एक नवा विक्रम घडवला होता. त्याच्या या बहारदार कामगिरीमुळे बीसीसीआयने खेलरत्न पुरस्कारासाठी त्यांचे नाव पाठवले.

आतापर्यंत केवळ तीन भारतीय क्रिकेटपटूंना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे. भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर यांना १९९७-९८ साली खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार मिळवणारे सचिन तेंडुलकर पहिले क्रिकेटपटू होते.

सचिन तेंडुलकर यांच्यानंतर एमएस धोनी याला २००७ साली हा सन्मान मिळाला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली तेव्हा भारताने पहिल्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला होता.

भारताचा विद्यमान कर्णधार विराट कोहली याला २०१८ साली खेलरत्न पुरस्कार मिळाला. प्रत्येक सामन्यात नवनव्या विक्रमांना गवसणी घालणारा विराट हा पुरस्कार घेणारा तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला होता.

रोहित खेलरत्न पुरस्कार मिळविण्यात यशस्वी ठरला तर तो चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरेल. खेलरत्न पुरस्कारासाठी अन्य खेळाच्या संघटनेनेही स्टार खेळाडूंची नावे या पुरस्कारासाठी पाठवली आहे.

You might also like