आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी आपला कार्यकाळ संपल्यानंतर अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत नवीन अध्यक्षपदाची शर्यत रंजक बनली असून यासाठी बीसीसीआयचे विद्यमान सचिव जय शाह यांचं नाव समोर येत आहे. जय शाह अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे राहतील की नाही, हे 27 ऑगस्टपर्यंत स्पष्ट होईल. या तारखेपर्यंत उमेदवार आयसीसी अध्यक्षपदासाठी अर्ज करू शकतात.
येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, एखादी व्यक्ती तीन वेळा आयसीसीचा अध्यक्ष बनू शकते. त्याचा कार्यकाळ 2 वर्षांचा असतो. न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले लवकरच अध्यक्ष म्हणून चार वर्षे पूर्ण करतील. त्यांचा सध्याचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपत आहे. म्हणजेच नवे अध्यक्ष 1 डिसेंबरपासून पदभार स्वीकारतील. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट आहे.
जय शाह ग्रेग बार्कले यांची जागा घेण्यासाठी सर्वात मोठे दावेदार असल्याचं बोललं जात आहे. शाह यांनी 2019 मध्ये बीसीसीआयचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला होता. 2025 मध्ये त्यांना 6 वर्ष पूर्ण होतील. शाह हे सध्या आयसीसीमध्ये आर्थिक आणि व्यावसायिक प्रकरणांचे प्रमुख आहेत.
जय शाह यांच्यासाठी जमेची बाजू म्हणजे, त्यांचे मतदान करणाऱ्या सर्व 16 सदस्यांशी चांगले संबंध आहेत. जर आपण आयसीसीच्या नियमांवर नजर टाकली, तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 16 मतं असतात. विजयासाठी 9 मतांच्या बहुमताची (51 टक्के) आवश्यकता असते. यापूर्वी अध्यक्ष होण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती.
जय शाह वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष बनून इतिहास रचू शकतात. त्यांच्या आधी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर या भारतीयांनी आयसीसीचं अध्यक्षपद भूषवलं आहे.
हेही वाचा –
इंग्लंडमध्ये श्रीलंकेच्या ड्रेसिंग रूममध्ये आग! जिवाच्या आकांताने बाहेर पडले खेळाडू, नेमकं काय घडलं?
महिला टी20 विश्वचषकाबाबत आयसीसीचा मोठा निर्णय, बांगलादेशऐवजी ‘या’ ठिकाणी होणार सामने
‘इशान किशनला टीम इंडियात जागा नाही’, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरचं वादग्रस्त विधान