fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

उद्यापासून सुरु होणाऱ्या कसोटी सामन्याआधी कर्णधार कोहली म्हणाला…

14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान इंदोर (Indore) येथे भारत विरुद्ध बांगलादेश ( India vs Bangladesh) संघात पहिला कसोटी सामना (Test Cricket) पार पडणार आहे. या कसोटी सामन्यापूर्वी बुधवारी (13 नोव्हेंबर) भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता. यामध्ये त्याने अनेक विषयांवर भाष्य केले आहे.

“भारतीय संघ फक्त मैदानावर येऊन जिंकू शकत नाही. त्यासाठी संघाला चांगली कामगिरी करण्याची आवश्यकता आहे. आम्ही इंदोरमध्ये कधीही पराभूत झालो नसलो, तरीही आम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल,” असे विराट म्हणाला.

“आम्ही कोणत्याही विरोधी संघाला कमजोर समजू शकत नाही. कोणताही संघ चांगली कामगिरी करू शकतो. टी20 मालिका (T20 Series) जिंकलो असलो तरीही बांगलादेशच्या गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आम्ही त्यांना कमजोर समजू शकत नाही,” असेही विराट म्हणाला.

भारताने बांगलादेशला नुकतेच टी20 मालिकेत 2-1ने पराभूत केले होते. या मालिकेमध्ये विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. त्याच्याजागी रोहित शर्माने (Rohit Sharma) भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.

“मला असे वाटते की, स्वत:वरील विश्वास आणि खेळाडूंमधील आपापसातील सामंजस्य यांमुळे भारतीय संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. याचे कारण हेच आहे की प्रत्येक खेळाडू मैदानावर येतो तेव्हा तो विचार करतो की आपल्या चांगल्या कामगिरीचा संघाला कसा फायदा होईल,” असे कर्णधार विराट म्हणाला.

“उमेश यादवने (Umesh Yadav) मागील काही सामन्यांमध्ये ज्या पद्धतीने उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे, त्याचप्रकारे मोहम्मद शमीही (Mohammed Shami) चांगली कामगिरी करत आहे. जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) तब्येत सध्या ठीक नाही.’

‘ईशांत शर्मा (Ishant Sharma) मागील 2 वर्षांपासून चांगली कामगिरी करत आहे. एकाच जागेवर चेंडू फेकून दुसऱ्या गोलंदाजांना विकेट घेण्याची संधी निर्माण करणे हीच इशांतची क्षमता आहे, पण त्याचबरोबर त्याने अनेकदा चांगल्या लयीत असताना चार-पाच विकेट्स घेतल्या आहेत,” असे गोलंदाजांची प्रशंसा करताना विराट म्हणाला.

पहिल्या कसोटीनंतर 22 नोव्हेंबरपासून ईडन गार्डन (Eden Garden), कोलकाता (Kolkata) येथे भारत विरुद्ध बांगलादेश संघात दुसरा आणि अंतिम कसोटी सामना पार पडणार आहे. हा दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. भारतात पहिल्यांदा दिवस-रात्र कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा सामना गुलाबी चेंडूने खेळला जाईल.

“गुलाबी चेंडूने (Pink Ball) खेळताना समस्या येऊ शकते. हा पहिलाच सामना आहे आणि त्याच्यासाठी थोडा वेळ देण्याची आवश्यकता आहे,” असेही विराट म्हणाला.

त्याचबरोबर, “कसोटी क्रिकेटला सर्वोच्च स्थानी ठेवण्यासाठी 5 कसोटी केंद्र असावे असा माझा असा विचार आहे,” असेही विराटने पुढे म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी विराट म्हणाला होता की, देशात कमीत कमी 5 कसोटी केंद्र (5 Test Center) असले पाहिजेत. जेणेकरून, प्रेक्षक स्टेडियममध्ये येऊन सामना पाहण्यासाठी प्रवृत्त होतील.

You might also like