हिरो इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल) चा दुसरा टप्पा सुरू झाला आहे आणि आता टॉप सहामधून बाहेर असलेला प्रत्येक संघ मुंसडी मारण्यासाठी सज्ज झाला आहे. बंगळुरू एफसी हा त्यातलाच एक संघ आहे. शुक्रवारी (23 डिसेंबर) घरच्या मैदानावर त्यांना गतविजेत्या हैदराबाद एफसीचा सामना करायचा आहे. श्री कांतिरावा स्टेडियमवर होणारी ही लढत जिंकून हिरो आयएसएलच्या या पर्वात प्रथमच सलग दोन विजयाची नोंद करण्याचा बंगळुरू एफसीचा प्रयत्न असेल. बंगळुरू एफसी 10 गुणांसह तालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. हैदराबाद एफसी 22 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
मागील सामन्यात दानिश फारूने पाचव्या मिनिटाला केलेल्या गोलच्या जोरावर बंगळुरू एफसीने यंदाच्या पर्वातील तिसरा विजय आणि तिसरी क्लीन शीट राखली. जमशेदपूर एफसी विरुद्धच्या या विजयानंतरही बंगळुरूचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीपासून आणखी बराच दूर आहे. मागील सामन्यात लेफ्ट बॅक पराग श्रीवस हा प्रबीर दासच्या जागी खेळला होता आणि त्याने जमशेदपूरविरुद्ध चांगली कामगिरी करून दाखवली होती. त्यामुळे या सामन्यात त्याला सुरुवातीपासून पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.
झेव्हियर हर्नांडेझनेही सुरेख पास अन् गोल करण्याच्या संधी निर्माण करताना चांगली कामगिरी करून दाखवली. पाब्लो पेरेझ याला मागील दोन सामन्यांत राखीव खेळाडू म्हणून मैदानावर उतरवले आहे आणि तो सुरुवातीपासून खेळण्याच्या संधीच्या शोधात आहे.
”प्रत्येक निकालातून काहीना काही शिकायचे असते. मागील आठवड्यात काही आघाड्यांवर आमची कामगिरी चांगली झाली आणि त्यावर आम्ही आनंदी आहोत, परंतु त्याचवेळी काही गोष्टींवर सुधारणा करण्याची गरज आहे. या पर्वात मिळवलेल्या तीनही विजयांत आम्ही क्लीन शीट राखली आहे. मागील आठवड्याप्रमाणेच पुढे कामगिरी करत राहिलो तर आम्ही कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो. पण, कामगिरीचा हा स्तर घसरला तर विजयाची शक्यताही कमी होईल,”असे मुख्य प्रशिक्षक सिमॉन ग्रेसन म्हणाले.
हैदराबाद एफसी पुरेशा विश्रांतीनंतर पुनरागमन करत आहेत आणि गतविजेत्यांना पुन्हा एकदा नंबर वन स्थान खुणावत आहे. मागील सामन्यांत त्यांनी ईस्ट बंगाल एफसीवर 2-0 असा विजय मिळवला, परंतु मुंबई सिटी एफसीने विजय मिळवून हैदराबादकडून अव्वल स्थान हिसकावले. मुंबई सिटी आणि हैदराबाद एफसी यांच्यात तीन गुणांचे अंतर आहे. त्यामुळे बंगळुरू एफसीविरुद्ध विजय मिळवून ते पुन्हा नंबर वन बनू शकतात.
मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्क्यूझ हे उद्याच्या सामन्यात काही प्रयोग करण्याची शक्यता आहे. झेव्हियर सिव्हेरियो आणि बोर्जा हेरेरा मागील सामन्यात राखीव खेळाडू म्हणून मैदानावर उतरले अन् मिळून संघासाठी दुसरा गोल केला. ही स्पॅनिश जोडी उद्या सुरुवातीपासूनच खेळण्याची शक्यता आहे किंवा मार्क्यूझ त्यांना पुन्हा राखीव खेळाडू म्हणून मैदानावर उतरवू शकतात.
TWO days to go! 🔥
Simon Grayson’s men return to @IndSuperLeague action on Friday, as Hyderabad FC come for battle at the Kanteerava. 🏟️
🔗 Tickets: https://t.co/Gp7SaSiJyv #WeAreBFC #BFCHFC #NothingLikeIt pic.twitter.com/DyncVmQ2ts
— Bengaluru FC (@bengalurufc) December 21, 2022
”आता लीगचा दुसरा टप्पा सुरू होतोय आणि हाच टप्पा प्रत्येक स्पर्धेत महत्त्वाचा असतो. यात अपयशाला संधीच नाही. आम्ही बंगळुरू एफसीविरुद्ध खेळलो आहोत आणि त्यांच्यासाठी आता प्रत्येक विजय महत्त्वाचा आहे. अव्वल सहामधील संघांमध्ये अन् त्यांच्यात 8 गुणांचे अंतर आहे. त्यामुळे अनिर्णित निकालही त्यांच्या उपयोगाचा नसेल. पहिल्या टप्प्यात आम्ही विजय मिळवला असला तरी आता बंगळुरू एफसीचा संघ अधिक आव्हानात्मक आहे,”असे मार्क्यूझ म्हणाले.
दोन महिन्यांपूर्वी उभय संघांमध्ये झालेल्या सामन्यात गतविजेत्यांनी बार्थोलोमेव ऑग्बेचेच्या गोलच्या जोरावर बंगळुरू एफसीचा पराभव केला होता. हिरो आयएसएलमध्ये आतापर्यंत 7 वेळा समोरासमोर आलेल्या उभय संघांत बंगळुरूने केवळ एक विजय मिळवला आहे. हैदराबादने 3 सामने जिंकले आहेत, तर तीन सामने ड्रॉ राहिले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीच्या आयुष्यातील माहीत नसलेल्या 4 गोष्टी
अठरा वर्षे आणि अनेक रेकॉर्ड्स! जाणून घ्या धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रोमांचक प्रवास