आयपीएलचा १४ वा हंगाम हा ऐतिहासिक होणार आहे. सलग दुसऱ्या वर्षी कोरोना विषाणूमुळे रिकाम्या स्टेडियममध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल. ही स्पर्धा अनेक कारणांनी वैविध्यपूर्ण ठरणार आहे. तसे, आयपीएलच्या इतिहासात असे अनेक संस्मरणीय क्षण आहेत, जे विसरले जाणे अशक्य आहेत किंवा ते या आधी कधीच पाहिले नाहीत.
आयपीएलचा दणक्यात शुभारंभ
आयपीएल प्रसिद्ध करण्यास सर्वात मोठा वाटा हा न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमचा आहे. आयपीएल इतिहासातील पहिल्याच सामन्यात केकेआरसाठी खेळताना त्याने आरसीबीच्या गोलंदाजांची पिसे काढताना ७८ चेंडूत नाबाद १५८ धावांचा तडाखा दिला. आयपीएलची यापेक्षा दमदार सुरुवात झाली नसती.
सलामीवीर रिकी पाँटिंग आणि सचिन तेंडुलकर
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात अविस्मरणीय क्षण म्हणजे सचिन आणि पाँटिंगची सलामी फलंदाजी. हे दोन्ही समकालीन दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटिंग ४ एप्रिल २०१३ रोजी आयपीएलच्या सहाव्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध मुंबई इंडियन्सकडून सलामी जोडी म्हणून मैदनात उतरले होते. हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात अविस्मरणीय क्षणांपैकी एक क्षण होता.
ख्रिस गेलचे तुफान
ख्रिस गेलची वादळी खेळी क्वचितच कोणी विसरेल. २०१२ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पुणे वॉरियर्स इंडिया यांच्यात झालेल्या सामन्यात गेलने विक्रमी खेळी केली. त्याने या सामन्यात अनेक विक्रम केले. त्याने ६६ चेंडूत १७५ धावा केल्या. गेलने ३० चेंडूत वेगवान शतक करून टी-२० मधील सर्वोत्तम खेळीचा विक्रम देखील नोंदविला. ९ वर्षानंतर त्याच्या या विक्रमी खेळीच्या आसपासही कोणी जाऊ शकले नाही.
पुणे स्टेशनवर पिवळा समुद्र
आयपीएलच्या इतिहासातील हा वेगळाच क्षण होता, जेव्हा एका संघाचे चाहते रेल्वे गाडीने इतर शहरामध्ये दाखल झाले. निलंबनानंतर २०१८ मध्ये परत आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला असेच चाहते मिळले. आपला संघ पुन्हा मैदानावर पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली, पहिल्या दोन सामन्यानंतर संघाचे उर्वरित सामने पुण्याच्या सहारा स्टेडिअममध्ये हलविण्यात आले. हे समजताच चेन्नईच्या चाहत्यांनीही पुण्याचा रस्ता धरला आणि त्यानंतर हे चाहते मोठ्या संख्येने रेल्वेने पुण्यात दाखल झाले. जणू संपूर्ण पुणे स्टेशन पिवळ्या रंगाने रंगवल्यासारखं वाटू लागले होते. प्रत्येकासाठी हा एक वेगळा अनुभव होता. त्यावर्षी चेन्नईने आपले तिसरे विजेतेपद पटकावत चाहत्यांना भेट दिली.
राहुल तेवतियाचे वादळ
कोरोना महामारीमुळे आयपीएलचा तेरावा हंगाम युएई येथे खेळला गेला. राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थानने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला. २२४ धावांचे आव्हान राजस्थानने चार चेंडू राखून पूर्ण केले. या सामन्यात भारताचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये अष्टपैलू राहुल तेवतियाने राजस्थानसाठी अठराव्या षटकात पंजाबचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेलला ५ षटकार लगावले.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट आयपीएलमध्ये तर अनुष्का शूटींगमध्ये व्यस्त; पाहा मग कोण करतंय चिमुकल्या वामिकाचा सांभाळ?