जागतिक क्रिकेटमध्ये सर्व संघ आपल्या खेळाडूंच्या चांगल्या प्रदर्शनावर अधिक भर देत असतात. कारण हे खेळाडूच त्यांना विजय मिळवून देत असतात. यात महत्वाची बाब म्हणजे, प्रत्येक संघाला चांगले गोलंदाज आणि फलंदाज मिळतात; पण चांगले यष्टीरक्षक मिळणे खूप कठीण आहे. त्याचबरोबर तो यष्टीरक्षक असूनही चांगली फलंदाजी करता येणे महत्त्वाचे असते. कारण संघासाठी कठीण काळात फलंदाजीही आवश्यक असते. असे खेळाडू भेटले तर संघासाठी चांगलीच बाब असते. यात मार्क बाउचर, ऍडम गिलख्रिस्ट आणि महेंद्रसिंग धोनी ही माजी यष्टीरक्षकांची उत्तम उदाहरण आहेत. सध्या काही खेळाडू आहेत जे खूप चांगले यष्टीरक्षक फलंदाज आहेत. आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊ.
मोहम्मद रिझवान
पाकिस्तान संघाचा 29 वर्षीय यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवानने फार कमी वेळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत:ला प्रस्थापित केले आहे. 2015 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून त्याने 17 कसोटी, 41 एकदिवसीय आणि 43 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या खात्यात एकूण 2843 धावांची नोंद झाली आहे. रिझवान फलंदाजीव्यतिरिक्त यष्टीमागेही खूप प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. या खेळाडूने आतापर्यंत यष्टीरक्षक म्हणून कसोटीत 49, एकदिवसीय सामन्यात 38 आणि 26 टी-20 बळी घेतले आहे.
क्विंटन डी कॉक
दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक सध्या क्रिकेटमधील सर्वोत्तम आणि विश्वासार्ह यष्टीरक्षक फलंदाजांपैकी एक मानला जातो. 28 वर्षीय डी कॉकने 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यानंतर त्याने 53 कसोटी, 124 एकदिवसीय आणि 54 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यात त्याच्या नावे अनुक्रमे 3245, 5355 आणि 1605 धावा आहेत. या प्रतिभावान क्रिकेटपटूची कामगिरी इथेच थांबली नाही. त्याने आतापर्यंत यष्टीमागे कसोटीत 225, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 179 आणि टी20त 62 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचवेळी, तो सतत चांगले प्रदर्शन देखील करत आहेत.
जोस बटलर
इंग्लंड संघातील मुख्य खेळाडूंपैकी एक जोस बटलर, जो काही दिवसांत 31 वर्षांचा होत आहे. तो खूप चांगला यष्टीरक्षक फलंदाज देखील आहे. क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात तो आपली प्रतिभा दाखवण्याची एकही संधी सोडत नाही. तसेच अलीकडेच तो दुसऱ्यांदा वडील बनणार आहे. सध्याचे वास्तव हे आहे की, इंग्लिश संघाकडे त्याच्यापेक्षा चांगला यष्टीरक्षक फलंदाज नाही. त्याने त्याच्या 283 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 8543 धावा केल्या आहेत. एवढेच नाही तर त्याने यष्टीमागे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 399 बळी मिळवले आहेत.
रिषभ पंत
भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. क्रिकेटच्या तिनही स्वरुपांमध्ये तो भारतीय संघाचा मुख्य भाग बनला आहे. आता असे वाटते की भारताची प्लेइंग इलेव्हन त्याच्याशिवाय अपूर्ण वाटते. त्याने आतापर्यंत फक्त 24 कसोटी, 18 एकदिवसीय आणि 33 टी-20 सामन्यात एकूण 2531 धावा केल्या आहेत. एवढेच नाही तर त्याने आतापर्यंत एकूण 104 झेल आणि 14 यष्टीचीत देखील केले आहेत. सध्या तो फक्त 23 वर्षांचा आहे आणि भारतासाठी तो बरेच क्रिकेट खेळू शकेल.
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेशच्या अडचणीत वाढ, अव्वल फलंदाजाची ‘या’ कारणामुळे टी२० विश्वचषकातून माघार
‘पोलार्ड अनस्टॉपेबल’! ताबडतोब खेळीसह टी२०त रचला इतिहास, गाठला ‘इतक्या’ हजार धावांचा पल्ला
कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा यष्टीरक्षक, ज्याच्या साधे २० सामनेही नाहीत आले नशीबी