fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पुणेकर बॉडीबिल्डिंगमय, पीळदार स्नायूंच्या खेळाडूंचे डोले शोले बघण्यासाठी पुण्यनगरी सज्ज

पुणे । ज्या क्षणाची पुणेकरच नव्हे तर अवघा देश आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आता दार ठोठावतोय. देशाच्या कानाकोपऱयातून शेकडो शरीरसौष्ठवपटूंचे पुण्यनगरीत आगमन झाले असून पुणेकरांना पीळदार स्नायूंच्या खेळाडूंचे डोले शोले पाहाण्याचे वेध लागलेत. शरीरसौष्ठवाच्या पुंभमेळ्यात सामील खेळाडूंचे याची देही दर्शन घेण्यासाठी पुणेकर क्रीडाप्रेमी सज्ज झाले आहेत.

भारत श्रीच्या निमीत्ताने झालेल्या पुण्यनगरीत भारतातील दिग्गज आणि आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू दाखल झाल्यामुळे आज पंचतारांकित हॉटेलमधील वातावरण पुर्णपणे बॉडीबिल्डिंगमय झाले होते.  

खेळाडूंची अभूतपूर्व उपस्थिती आणि जबरदस्त वातावरणामुळे प्रत्यक्ष बालेवाडीत क्रीडाप्रेमींची निराशा होऊ नये म्हणून मोठ्या एलईडी क्रीन लावण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे ज्यांना प्रत्यक्षात स्टेडियममधून भारत श्रीचा थरार पाहता येणार नाही ते क्रीडाप्रेमी भव्य एलइडीवरून स्पर्धेचा आनंद घेऊ शकतील.

भारतात दिवसेंदिवस वाढत चाललेली शरीरसौष्ठवाची क्रेझ आणि ताकद आता पुण्यातही दिसू लागलीय. दिग्गज खेळाडूंच्या आगमनामुळे शरीरसौष्ठव प्रेमींमध्ये नवचैतन्य पसरले आहे.

भारतीय शरीरसौष्ठव महासंघाने शरीरसौष्ठवपटूंच्या पुंभमेळ्यासाठी सर्वार्थाने बळ लाभल्यामुळे स्पर्धेचे आयोजन न भूतो न भविष्यति होणार असल्याचे बोलले जात आहे. 600 खेळाडू आणि तब्बल 50 लाखांची रोख पारितोषिके.

हे सारे काही विक्रमी असल्यामुळे हा पुंभमेळा शरीरसौष्ठव जगतासाठी ऐतिहासिकच असेल, असा विश्वास इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनचे सरचिटणीस चेतन पाठारे यांनी बोलून दाखविला.शरीरसौष्ठवाच्या इतिहासात प्रथमच 50 लाखांपेक्षा अधिक रकमेची रोख बक्षीसे पीळदार स्नायूंच्या शरीरसौष्ठवपटूंना दिली जाणार असल्यामुळे शरीरसौष्ठवपटूंसह पुणेकरांचीही छाती अभिमानाने फुलली आहे.

एकापेक्षा एक शरीरसौष्ठवपटूंची ताकद दिसणार

शरीरसौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात बालेवाडीत अनेक विक्रम मोडले जाणार हे आज निश्चित झालेय. या स्पर्धेसाठी विक्रमी संख्येने खेळाडू आज पुण्यात दाखल झाले.

स्पर्धेत सर्वात बलाढ्य संघ महाराष्ट्राचाच आहे. हॅटट्रीकसाठी सज्ज असलेल्या सुनीत जाधवला आपले जेतेपद राखण्यासाठी सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे.

त्याला फक्त महाराष्ट्राबाहेरील खेळाडूंकडूनच आव्हान आहे, असे नाही तर महाराष्ट्राच्या महेंद्र पगडेकडूनही त्याला काँटे की टक्कर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्राच्या संघात सागर कातुर्डे, नितीन म्हात्रे, महेंद्र चव्हाण, अक्षय मोगरकर आणि अतुल आंब्रे हे संभाव्य पदक विजेतेही खेळाडू आहेत. महाराष्ट्राची खरी लढाई रेल्वेच्या खेळाडूंशी रंगणार आहे. आंतररेल्वे स्पर्धेचा विजेता जावेद खान, राम निवास, किरण पाटील आणि सागर जाधव हे तयारीतले खेळाडू महाराष्ट्राला कडवे आव्हान देणार हे निश्चित आहे.

तसेच केरळचा रियाझ टी.के., रशीद,दिल्लीचा मित्तल सिंग, नरेंदर, सीआरपीएफचा हरीराम आणि प्रीतम, पंजाब पोलीसांचा हिरालाल, सेनादलाचे अनुज, महेश्र्वरन आणि दयानंद सिंग यांच्या सहभागामुळे यंदाची भारत श्री आणखी चुरशीची झाली आहे. त्यामुळे यंदा पुणेकरांनी स्पर्धेचा विजेता म्हणून अन्य कुणाचे नाव पाहिले तर आश्चर्य मानू नये.

एक लाख अंडी आणि 6 हजार किलो चिकन

भारत श्री सर्वार्थाने ऐतिहासिक ठरणार यात वाद नाही. 600 पेक्षा अधिक खेळाडू या स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. शरीरसौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सर्व खेळाडू आणि पदाधिकारी अशा तब्बल एक हजार जणांची निवास आणि भोजनाची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.
त्याचबरोबर खेळाडूंना यादरम्यान त्यांच्यासाठी सकस आहार पुरवणे हेसुद्धा एक मोठे आव्हान असते. त्याच्या आहारात मीठ, मसाला आणि तेल काहीही नसते. खेळाडूंच्या आहारासाठी 1 लाख अंडी आणि 6 हजार किलो सोललेले चिकन मागविण्यात आले आहे. हा फक्त खेळाडूंच्या तीन दिवसांचा सकस आहार असून फळांचीही सोय करण्यात आल्याचे चेतन पाठारे यांनी सांगितले.

You might also like