Wednesday, February 1, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग 5- लढवय्या साईराज बहुतुले!

लढवय्या साईराज बहुतुले!

January 6, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
sairaj bahutule

Photo Courtesy: Twitter/rajasthanroyals


सचिन आणि कांबळीची हॅरिस शिल्डमधली विश्वविक्रमी भागीदारी आठवतेय? या दोघांनी शारदाश्रमकडून खेळताना सेंट झेवियर्सच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या होत्या. सचिन आणि कांबळीच्या कारकिर्दीमध्ये या खेळीने मैलाचा दगड म्हणून काम केले. हे दोघेही पुढे भारतासाठी खेळले. याच सामन्यात झेवियर्सच्या गोलंदाजीचे नेतृत्व केलेला एक खेळाडूदेखील पुढे जाऊन भारतासाठी खेळला. सचिन आणि कांबळीने झेवियर्सच्या इतर गोलंदाजांबरोबर त्याच्याही गोलंदाजीची पिसे काढली होती. त्याने टाकलेल्या 27 षटकांत 182 धावा कुटल्या गेल्या होत्या. पुढे तो मुंबईच्या रणजी संघाचा अविभाज्य घटक बनला. मुंबईकडून त्याने सहा वेळा रणजी करंडक जिंकला. 1980च्या दशकात मुंबई निवड समितीने उज्वल भविष्य असलेल्या काही निवडक खेळाडूंवर लक्ष केंद्रित केले होते. त्यात तेंडुलकर, कांबळी, जतीन परांजपे यांच्याबरोबर त्याचेही नाव होईल. तो खेळाडू होता साईराज बहुतुले. साईराजचा आज (6 जानेवारी) 50वा वाढदिवस.

साईराजची क्रिकेट कारकीर्द सुरु होत होती त्यावेळी 1990 मध्ये एके दिवशी साईराज, त्याचा मित्र विवेक सिंग (दिवंगत गायक जगजित सिंग यांचा मुलगा) यांच्या गाडीला मोठा अपघात झाला. या अपघातात विवेक आणि गाडीचा ड्रायव्हर असे दोघे जण जागीच मरण पावले. साईराजला गंभीर दुखापत होऊन तो कोमात गेला. शुद्धीवर आला तेव्हा त्याला कळले की त्याच्या उजव्या मांडीचे हाड आणि डावा कोपर फ्रॅक्चर झाले होते. साईराज तेव्हा फक्त 17 वर्षांचा होता.

त्याच्या मांडीमध्ये स्टीलचा रॉड टाकण्यात आला. देशासाठी सोडा मुंबईसाठी सुद्धा खेळू की नाही याची खात्री त्याला वाटत नव्हती. साईराजचे वडील, महाराष्ट्राचे माजी रणजीपटू वसंत बहुतुले (1953 साली महाराष्ट्रासाठी त्यांनी दोन सामने खेळले होते. या दोन्ही सामन्यांत त्यांनी यष्टिरक्षणाची जबाबदारीही पार पाडली होती.) यांना मात्र आपला मुलगा बरा होणार आणि खेळणार याची खात्री होती. त्या दुखापतीच्या काळात आई वडिलांनीच आपल्याला मानसिक आधार दिला असे साईराज आजही आवर्जून सांगतो.

बरा होऊन साईराजने सराव करायला सुरुवात केली. एवढ्या मोठ्या दुखापतीतून बरे होणे ही एक गोष्ट आणि पुढे जाऊन 20 वर्षे स्पर्धात्मक क्रिकेट खेळणे ही त्याहून कितीतरी मोठी गोष्ट. साईराज मेहनत करत होता. याच दरम्यान तो फ्रॅंक टायसन हे प्रशिक्षक असलेल्या बीसीए-मफतलाल कॅंपला जाऊ लागला. हा कॅंप त्याच्या कारकिर्दीसाठी दिशादर्शक ठरला. याच कॅंपमध्ये त्याला आपल्या शारिरीक क्षमतेची कुवत कळली. साईराज तेव्हा दिवसाला सात तास सरावासाठी देत असे.

लवकरच साईराजला मुंबईच्या 19 वर्षाखालील संघात स्थान मिळाले. त्यावेळी त्याने 3 सामन्यांमध्ये 19 बळी मिळवले होते. यात महाराष्ट्राविरुद्धच्या 7 बळींचाही समावेश होता. यातल्या एका सामन्यात त्याने शतकही काढले होते. साईराजच्या ह्या खेळीने दिलीप वेंगसरकर प्रभावित झाले. त्यांनी साईराजचा समावेश मुंबई रणजी संघात व्हावा यासाठी आग्रह धरला. मुंबईसाठी केलेल्या या चमकदार कामगिरीने त्यावेळी त्याची भारताच्या 19 वर्षाखालील संघामध्येही निवड झाली होती.

1991-92 च्या हंगामात साईराजने रणजी खेळायला सुरुवात केली. गुजरात विरुद्धच्या आपल्या पहिल्या रणजी सामन्यात त्याने 4 बळी मिळवले होते. रणजी क्रिकेटमध्ये हळूहळू त्याने आपला दबदबा निर्माण केला. एक चांगला फिरकी गोलंदाज म्हणून त्याच्याकडे बघितले जाऊ लागले. साईराज फलंदाजीही बरी करत असे. 1992-93 च्या हंगामात त्याने महाराष्ट्राविरुद्ध शतकही काढले होते. एक फलंदाज आणि गोलंदाज म्हणून देशांतर्गत स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या साईराजला आता भारतीय संघाचे वेध लागले होते. अनिल कुंबळे, वेंकटपथी राजू, राजेश चौहान असे देशांतर्गत स्पर्धांमधले ‘दादा’ फिरकी गोलंदाज असताना साईराजला संधीसाठी वाट पाहण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता.

1997 च्या इराणी करंडकाच्या सामन्यात त्याने शेष भारत संघाविरुद्ध 71 धावा काढत आणि 13 बळी मिळवत पुन्हा एकदा निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. (साईराजला ज्याच्यामुळे भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी वाट पहावी लागली त्या अनिल कुंबळेने याच सामन्यात शेष भारत संघाकडून 11 बळी मिळवले होते.)

डिसेंबर 1997 मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या श्रीलंका संघाविरुद्धच्या मालिकेसाठी साईराजची भारतीय एकदिवसीय संघात निवड झाली. आपल्या पहिल्या सामन्यात 9 षटके टाकत त्याने 3.66 च्या सरासरीने 33 दिल्या. याच सामन्यात रॉबिन सिंगने 5 षटकांत 22 धावा देत 5 बळी मिळवून साईराजने केलेली चांगली कामगिरी झाकोळून टाकली. आपला पहिला बळी मिळविण्यासाठी साईराजला अजून दोन सामने वाट पहावी लागली. याच मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात साईराजने रोशन महानामाला बाद करून एकदिवसीय क्रिकेटमधला आपला पहिला बळी नोंदवला. आपल्या एकदिवसीय कारकिर्दीमध्ये खेळलेल्या 8 सामन्यांत 283 धावा देत त्याने फक्त 2 बळी मिळवले. रणजी, इराणी अशा देशांतर्गत स्पर्धांमध्ये एक चांगला फिरकी गोलंदाज म्हणून दबदबा असलेला हा खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःला सिद्ध करू शकला नाही. अर्थातच भारताच्या एकदिवसीय संघातून त्याला घरचा रस्ता दाखवण्यात आला.

तीन वर्षानंतर अनिल कुंबळेला झालेल्या दुखापतीमुळे साईराला भारतीय कसोटी संघात जागा मिळाली. ही मालिका 15 कसोटी सामने जिंकून आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होती आणि भज्जी सारखा अव्वल फिरकी गोलंदाज भारताकडून खेळत होता. साईराजला त्याच्याशी स्पर्धा करत स्वतःला सिद्ध करायचे होते. भारतीय संघाने ही कसोटी मालिका जिंकली तरी साईराज मात्र केवळ 2 बळी मिळवू शकला. प्रचंड फॉर्मात असलेल्या भज्जीने मात्र या सामन्यात 15 बळी घेत भारताच्या विजयाला हातभार लावला. त्यानंतरच्या श्रीलंका दौऱ्यातही त्याला संधी मिळाली पण तो आपली छाप पाडू शकला नाही. आपल्या कारकिर्दीतल्या 2 कसोटी सामन्यांमध्ये 203 धावा देत त्याने 3 बळी मिळवले.

देशांतर्गत स्पर्धांमध्ये 15 वर्षे मुंबईकडून खेळल्यानंतर साईराज तीन वर्षे महाराष्ट्राकडून खेळला. 2008 साली घरवापसी करून पुन्हा मुंबईकडून खेळत त्याने त्या वर्षीचा रणजी करंडक जिंकला. त्यानतंर आधी आसाम मग आंध्रप्रदेश असा प्रवास करून अखेरीस आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीची अखेर त्याने विदर्भाकडून केली. 2012-13 च्या हंगामात आपल्या अखेरच्या रणजी सामन्यात साईराज 17 आणि 0 धावा काढून बाद झाला. या सामन्यात त्याला एकही बळी मिळवता आला नाही.

आपण खेळलेल्या प्रत्येक रणजी संघाचा कर्णधार म्हणून काम करण्याचा अनोखा विक्रमही साईराजने केला. बरी एक फलंदाजी करू शकणारा चांगला फिरकी गोलंदाज म्हणून साईराजचा समावेश भारतीय संघात केला गेला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली साईराजची आकडेवारी पाहिली तर तो एक सुमार दर्जाचा खेळाडू आहे असे कोणालाही वाटू शकते. पण याच साईराजने आपल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये 188 प्रथम श्रेणी सामन्यांत एका बळीमागे 26 धावा देत 630 बळी मिळवले. गोलंदाजीबरोबर फलंदाजीतही आपली चमक दाखवत साईराजने 9 शतके आणि 26 अर्धशतकांच्या मदतीने 6176 धावा देखील काढल्या होत्या. मुंबईकडून खेळताना दोन वेळेस त्याने 300 धावा आणि 30 पेक्षा जास्त बळी अशी कामगिरी केली होती. या दोन्ही वेळेस मुंबईने रणजी करंडक जिंकला होता.

साईराजकडे गुणवत्ता नव्हती असे नाही. ती नसती तर त्याने मुंबईला एकहाती सामने जिंकून दिले नसते. मात्र जेव्हाजेव्हा संधी मिळाली तेव्हा तो स्वतःला सिद्ध करू शकला नाही. अनिल कुंबळे, भज्जी सारख्या महान फिरकी गोलंदाजांबरोबर स्पर्धा करावी लागली हे कदाचित साईराजचे दुर्दैव म्हणावे लागेल. आज निवड समिती तरुण खेळाडूंवर जसा विश्वास ठेवते, त्यांना पुन्हापुन्हा जशी संधी देते तशीच आपल्याला मिळाली नाही अशी खंत साईराजने एकदा बोलून दाखवली होती.

निवृत्तीनंतर त्याने प्रशिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. विदर्भ संघाचा प्रशिक्षक म्हणून काही दिवस काम केल्यानंतर 2014 मध्ये तो केरळचा रणजी प्रशिक्षक बनला. त्यानंतर लगेचच 2015 च्या हंगामासाठी त्याने बंगालचा प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पत्करली. बंगालचे प्रशिक्षकपद स्वीकारण्याअगोदर काही दिवस मुंबईच्या 23 वर्षाखालील संघाच्या प्रशिक्षकपदी त्याची निवड झाली होती.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या फिरकी गोलंदाजांच्या अकादमीतदेखील तो प्रशिक्षक म्हणून काम करत होता. असे असतानाही त्याने बंगाल क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा स्वीकारली. याबाबत त्यावेळचे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप वेंगसकर यांनी त्याच्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यावर आपण एमसीए बरोबर कोणताही लेखी करार केला नव्हता असे स्पष्टीकरण साईराजने दिले होते.

साईराजची क्रिकेट कारकीर्द
एकदिवसीय
सामने – 8, धावा – 23, बळी – 2
कसोटी
सामने – 2, धावा – 39, बळी – 3
प्रथम श्रेणी
सामने – 188, धावा – 6176, बळी – 630

-आदित्य गुंड ([email protected])

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
क्रिकेटवरील “भारतीय क्रिकेटचे शापीत शिलेदार” लेखमालिकेतील काही खास लेख-
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १० – विस्मृतीत गेलेला अजय रात्रा
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ९ – तिसरा गोलंदाज
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ८ – आठवावा लागणारा निखिल चोप्रा


Next Post
Arshdeep Singh

अरे, भावा तू करतोय तरी काय! अर्शदीपच्या नो-बॉलमुळे भडकले टीम इंडियाचे चाहते, रिऍक्शनचा पाऊस

Photo Courtesy: Twitter/ BCCI

भारताच्या पराभवावर हेड कोच राहुल द्रविडची प्रतिक्रिया! म्हणाले, 'युवा खेळाडूंकडून चुका...'

kapil-dev

वाढदिवस विशेष: 1983 विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल खास 10 गोष्टी

Please login to join discussion

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143