प्रतिष्ठित यूएस ओपन 2024 मध्ये खूप मोठा अपसेट झाला आहे. स्पेनचा दिग्गज खेळाडू कार्लोस अल्कारेज यूएस ओपन मधून बाहेर पडला. अल्कारेजला जागतिक क्रमवारीत 74व्या स्थानी असलेल्या डच खेळाडू बोटिक व्हॅन डी झांडस्कल्पनं 2 तास 19 मिनिटं चाललेल्या मॅरेथॉन लढतीत 6-1, 7-5, 6-4 असे पराभूत केले.
विशेष म्हणजे, हे दोन्ही खेळाडू याआधी दोनदा भिडले होते, जिथे अल्कारेजनं दोन्ही वेळा विजय मिळवला होता. परंतु यावेळी त्याचा पराभव झाला. याआधी 2022 मध्ये स्विस इनडोअर बेसल आणि 2021 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर आले होते. या दोन्ही सामन्याक अल्कारेजनं बाजी मारली होती.
नेदरलँड्सच्या बोटिक व्हॅन डी झांडस्कल्पनं या विजयासह एक मोठा इतिहास रचला. 1991 नंतर यूएस ओपनमध्ये टॉप 3 खेळाडूंना पराभूत करणारा तो पहिला डच खेळाडू ठरला आहे.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या कार्लोस अल्काराजनं 2022 मध्ये यूएस ओपनचं विजेतेपद पटकावले होतं. गुरुवारी (29 ऑगस्ट) बिगरमानांकित बोटिक व्हॅन डी झांडस्कल्पकडून सरळ सेटमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवामुळे या वर्षी फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनमध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या अल्कारेजची 15 सामन्यांची विजयी मोहीम थांबली.
डच खेळाडूनं पहिल्या सेटमध्ये पहिले तीन गेम जिंकले आणि सहाव्या गेममध्ये अल्कारेजची सर्व्हिस मोडून सेट जिंकला. यानंतर अल्कारेजनं दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र या सेटमध्येही बोटिक व्हॅन डी झांडस्कल्पनं बाजी मारली. डच खेळाडूनं तिसरा आणि निर्णायक सेट 6-4 असा जिंकून सामना आपल्या नावे केला.
हेही वाचा –
ऑलराउंडर रिंकू! आधी बॅटनं केला कहर, मग चेंडूनं बदलून टाकली संपूर्ण मॅच
कोणत्या फलंदाजाला गोलंदाजी करणं सर्वात कठीण जातं? जसप्रीत बुमराहनं दिलं अनोखं उत्तर
लज्जास्पद! विदेशात खेळायला गेलेले 3 पाकिस्तानी खेळाडू मायदेशी परतलेच नाहीत