आज अफगाणिस्तानचा युवा फिरकी गोलंदाज राशिद खानचा 22 वा वाढदिवस आहे. अफगणिस्तानच्या राष्ट्रीय संघात वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षीच स्थान मिळवणारा तो सर्वात तरूण खेळाडू ठरला होता. तसेच मागीलवर्षी तो कसोटीतील सर्वात युवा कर्णधार देखील ठरला.
अशा या फिरकी गोलंदाज राशिद खानच्या विषयी जाणून घेऊ थोडक्यात:
-राशिद खानचा जन्म 20 सप्टेंबर 1998 ला अफगाणिस्तानच्या नंगारहार या छोट्याश्या प्रांतात झाला.
-राशिदचे कुटुंब मोठे असून त्याला 5 मोठे भाऊ आहेत.
-वयाच्या17 वर्षे आणि 36 दिवसाचा असताना त्याने अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवले.
-आपल्या लेग स्पिन गोलंदाजीने फलंदाजांना नाचवणाऱ्या राशिद खानचा गोलंदाजीतील आर्दश आहे पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी आणि फलंदाजीतला आदर्श भारताचा कर्णधार विराट कोहली. त्याचा आदर्श असणाऱ्या शाहीद आफ्रिदीने 1996 साली वयाच्या 16 व्या वर्षी पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू केली होती.
-राशिद खानने 2016 ला 19 वर्षांखालील विश्वचषकातही दमदार कामगिरी केली. त्याने या विश्वचषकात सहा सामन्यात 10 बळी मिळवले होते. तसेच तो 2016 च्या टी20 विश्वचषकात वरिष्ठ अफगाणिस्तान संघाकडूनही खेळला. या स्पर्धेत तो दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता. त्याने सात सामन्यात 11 बळी घेतले होते.
-राशिद खान आयपीएलच्या 10 व्या सत्रात अफगाणिस्तानचा सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला. त्याला 4 कोटी रूपायांची बोली लावत हैद्राबाद संघाने आपल्याकडे घेतले. त्याद्वारे त्याला आपला फलंदाजीतला आदर्श विराट कोहलीच्या विरुद्ध गोलंदाजी करण्याची संधी मिळाली होती.
-आयपीएलमध्ये सनरायर्स हैदराबादकडून खेळताना त्याने 46 सामन्यात 21.69 च्या सरासरीने 55 बळी घेतले. फलंदाजांची मक्तेदारी असणाऱ्या या स्पर्धेत राशिद खानने 6.55 इकॉनॉमीने गोलंदाजी केली आहे. त्याची आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यातील आणि वनडे सामन्यातील ईकॉनॉमी ही अनुक्रमे 6.14 आणि 4.16 आहे.
-24 फेब्रुवारी 2018 ला आयर्लंड विरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात राशिदने 4 चेंडूत 4 विकेट्स घेतल्या. त्यावेळी तो आंतरराष्ट्रीय 20मध्ये 4 चेंडूत 4 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला होता.
– राशिदने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 4 कसोटी, 70 वनडे आणि 48 टी20 सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे 23, 133 आणि 89 विकेट्स घेतल्या आहेत.