जुलै २०१० मध्ये मुथय्या मुरलीधरनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हा असे मानले गेले होते की, श्रीलंका संघात त्याची जागा कोणीही घेऊ शकणार नाही. त्यावेळी ही धारणा योग्य वाटत होती. कारण, मुरलीधरनने १३३ कसोटी सामन्यांमध्ये ८०० बळी मिळवून निवृत्ती घेतली होती. त्यावेळी कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही तज्ञ फिरकीपटूने श्रीलंकेसाठी घेतलेले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक बळी होते ७१ आणि ते बळी घेणारा गोलंदाज होता ‘रंगना हेराथ’. कोणाला त्यावेळी स्वप्नातही वाटले नसेल की, हा खेळाडू पुढे जाऊन श्रीलंका क्रिकेटसाठी मुरलीधरन सारखेच योगदान देईल.
फलंदाज, लिपिक आणि व्यवसायीक क्रिकेटपटू
हेराथचा जन्म १९ मार्च १९७८ रोजी कुरूनेगाला या छोट्याशा गावात झाला. त्याचा मोठा भाऊ दिप्थी हा देखील क्रिकेटपटू. आपल्या शाळेच्या संघासाठी रंगना सलामीवीर फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाजी करायचा. मात्र, त्याच्या प्रशिक्षकांनी त्याची उंची कमी असल्याने त्याला फिरकी गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला. गुरुचा सल्ला ‘सर आखों पर’ मानून त्याने फिरकीपटू बनण्याचा निर्णय घेतला. व्यवसायिक क्रिकेटपटू बनण्यापूर्वी त्याने बँकेत लिपिक म्हणून काम देखील करण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्याच वेळी त्याला श्रीलंकेचा राष्ट्रीय खेळाडू चंदिका हतुरासिंगा याचा भाऊ भेटला आणि त्याचे आयुष्य बदलले. त्यांच्याच मार्गदर्शनाने तो मोठ्या स्पर्धा खेळू लागला आणि १९९६-१९९७ च्या हंगामात त्याने कुरूनेगाला संघासाठी प्रथमश्रेणी पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय पदार्पण केले पण…
देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्याचे बक्षीस त्याला १९९९ मध्ये मिळाले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यातून त्याने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. पहिल्याच डावात तो ४ बळी घेण्यात यशस्वी ठरला. पदार्पण केले तरीही त्याला श्रीलंका संघात सातत्याने संधी मिळत नव्हती. कारण, मुरलीधरन निर्विवादपणे त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर राज्य करत होता आणि अष्टपैलू म्हणून सनथ जयसूर्या त्याला यथायोग्य साथ देत. अशा परिस्थितीत, हेराथला जास्त काळ बाकेच गरम करावी लागली. कसोटी पदार्पणाच्या तब्बल पाच वर्षांनंतर २००४ मध्ये त्याने आपला पहिला वनडे सामना खेळला.
मुरलीधरनचा वारसदार
रंगना हेराथ या नावाला खरी ओळख मिळाली ती मुथय्या मुरलीधरनच्या निवृत्तीनंतर. मुरली जुलै २०१० मध्ये कसोटी तर, २०११ विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाजूला झाला. त्यावेळी, ३२ वर्षाचा असलेला हेराथ एकप्रकारे नव्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत होता आणि त्याच्यापुढे आव्हान होते श्रीलंकेच्या महान फिरकीपटूंचा वारसा पुढे चालवण्याचे. अजंता मेंडिस, सुरज रणदिव आणि सचित्र सेनानायके यांच्यासारखे तरुण गोलंदाज सुरुवातीला छाप पाडल्यानंतर आपली लय गमावून बसले आणि हेराथने संधीचे सोने करण्यास सुरुवात केली.
सन २०११ मध्ये श्रीलंकेचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला असता, दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच देशात पराभूत करण्याची किमया श्रीलंकेने पहिल्यांदाच केली. या विजयाचा नायक होता हेराथ. त्याने सामन्यात ९ बळी आपल्या नावे केले होते. त्यानंतरही सातत्याने तो श्रीलंकेच्या अनेक विजयांचा साक्षीदार बनत राहिला. कसोटी क्रिकेटमध्ये कॅरम बॉल वापरण्यास त्याने सुरुवात केली होती.
कसोटी गोलंदाज म्हणून प्रसिद्ध होत असतानाच हेराथला २०१४ टी२० विश्वचषकात संधी मिळाली. न्यूझीलंडविरुद्ध ‘करा किंवा मरा’ अशा सामन्यात त्याने अवघ्या ३ धावांत ५ बळी मिळवून श्रीलंकेला पुढच्या फेरीत जाण्यास मदत केली. पुढे, श्रीलंका या विश्वचषकाचा विजेता राहिला. २०१६ मध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेट खेळणे सोडल्यानंतर, तो फक्त कसोटी क्रिकेट खेळू लागला आणि गाजवतही साहिल. अखेर, नोव्हेंबर २०१८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध अखेरचा सामना खेळत त्याने आपल्या १९ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पूर्णविराम दिला.
कारकिर्दीचे दोन टप्पे
हेराथची आंतरराष्ट्रीय कारकीर्द दोन वेगवेगळ्या भागांमध्ये विभागली आहे. जोपर्यंत मुरलीधरन श्रीलंका क्रिकेटसाठी योगदान देत होता, तोपर्यंत हेराथने ११ वर्षात श्रीलंकेसाठी फक्त २२ कसोटी सामने खेळून ७१ बळी मिळवले होते. मात्र, मुरलीधरननंतर त्याने फिरकीपटू म्हणून श्रीलंका नव्हे तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा बनवून ठेवला. मुरलीधरनच्या निवृत्तीनंतर त्याने श्रीलंकेसाठी ७० कसोटी सामने खेळताना ३५९ बळी आपल्या नावे केले. निवृत्ती घेताना त्याच्या नावे ४३३ बळी होते आणि कोणताही डावखुऱ्या गोलंदाजाने सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम त्याच्या नावे जमा झाला होता.
अफाट गुणवत्ता असतानाही, हेराथची कारकिर्दीतील उमेदीची वर्ष फक्त संघात दुसरा दिग्गज फिरकीपटू असल्याने वाया गेली होती. मात्र, त्यानंतरही अजिबात हार न मानता आपल्याला मिळालेल्या संधीचे अक्षरशः सोने करत, आपण त्यावेळी ही मुरलीधरनपेक्षा कमी नव्हतो. असेच जणू काही हेराथने सबंध क्रिकेटविश्वाला ठासून सांगितले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
मागच्या हंगामात फेल झालेला ‘हा’ पठ्ठ्या म्हणतोय, ‘मला सनरायझर्सचे पैसे परत करायचेत…’
भारतीय संघाला मिळाला नवीन ‘हिटमॅन?’, रोहितची जागा घेत पाडणार धावांचा पाऊस
शुबमन गिल ते ऋतुराज गायकवाड, भारतीय संघाचे भविष्यातील ५ सलामीवीर; पाहा संपूर्ण यादी