जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल २०२१) उर्वरित हंगामाला सुरुवात होण्यास एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. मे महिन्यात कोरोनामूळे स्पर्धातून स्थगित करावी लागली होती. त्यानंतर आता संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) उर्वरित हंगाम १९ सप्टेंबरपासून सुरू होईल.
आयपीएलमध्ये नेहमीच चौकार व षटकारांची आतिषबाजी होत असते. फलंदाज आपल्या कौशल्याच्या जोरावर नेहमीच उत्तुंग फटकेबाजी करताना दिसतात. मात्र, त्यामध्ये गोलंदाजांची दुर्दशा होते. आज आपण अशा सहा गोलंदाजांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार आपल्या गोलंदाजीवर दिले आहेत.
१) ड्वेन ब्रावो-
वेस्ट इंडीजचा दिग्गज अष्टपैलू आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व करतो. ब्रावो हा आयपीएलचा एका हंगामात सर्वाधिक षटकार लुटवणारा गोलंदाज आहे. ब्रावोच्या गोलंदाजीवर २०१८ आयपीएल हंगामात सर्वाधिक २९ षटकार खेचले गेले होते.
२) युजवेंद्र चहल-
भारताचा व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा प्रमुख लेगस्पिनर युजवेंद्र चहल या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या गोलंदाजीवर २०१५ आयपीएलमध्ये २८ षटकार ठोकले गेलेले.
३) कुलदीप यादव व शार्दुल ठाकूर-
भारताचा चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव व अष्टपैलू शार्दुल ठाकूर हे यादीमध्ये संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. २०१८ आयपीएलमध्ये कुलदीप कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व करत असताना व शार्दुल चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळत असताना दोघांच्याही गोलंदाजीवर प्रत्येकी २४ षटकार मारले गेलेले.
४) लसिथ मलिंगा व हार्दिक पंड्या-
मुंबई इंडियन्सने २०१९ मध्ये विक्रमी चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. मात्र, या हंगामात संघाचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा व प्रमुख अष्टपैलू हार्दिक पंड्या यांच्या गोलंदाजीवर प्रत्येकी २३ षटकार विरोधी फलंदाजांनी ठोकले होते.