आयर्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज बॉयड रँकिन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. शुक्रवारी (२१ मे) त्याने अचानकपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. रँकिन इंग्लंडसाठी देखील खेळला आहे. १८ वर्षांच्या कारकीर्दीत त्याने आयर्लंड व इंग्लंडकडून ३ कसोटी, वनडे व ५० टी२० सामने खेळले आहेत. आयर्लंडकडून पहिला कसोटी विकेट घेण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
सन २००३ मध्ये प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा बॉयड रँकिन हा वेगवान आणि सपाट खेळपट्ट्यांवर बाऊन्स मिळवण्यासाठी प्रसिद्ध होता. आपल्या १८ वर्षांच्या कारकीर्दीत त्याने १६९ आंतरराष्ट्रीय बळी घेतले आहेत.
आपल्या निवृत्तीच्या घोषणेवेळी बोलताना रँकिन म्हणाला, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय नेहमीच कठीण असतो. मात्र, मला असे वाटते की, खेळ सोडण्याची वेळ आली आहे. २००३ पासून मी तन-मन एकत्र करून व्यावसायिक क्रिकेट खेळतोय. इतके वर्ष मी आयर्लंडकडून खेळेल असे वाटले नव्हते. आयर्लंडसाठी मी इतके विश्वचषक खेळलो हे अभिमानास्पद आहे.”
म्हणून केले इंग्लंडचे प्रतिनिधित्व
बॉयड रँकिन हा दोन देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मोजक्या क्रिकेटपटूंमध्ये समाविष्ट होतो. आयर्लंडला कसोटी संघाचा दर्जा प्राप्त न झाल्यामुळे त्याने आपला माजी सहकारी ओएन मॉर्गनप्रमाणे २०१३ मध्ये इंग्लंडसाठी खेळण्याचा निर्णय घेतला. २०१३-२०१४ च्या ऍशेस मालिकेतील सिडनी कसोटीतून त्याने कसोटी पदार्पण केले. पुन्हा आयर्लंडसाठी खेळण्यापूर्वी त्याने इंग्लंडचे ७ वनडे व ३ टी२० मध्ये प्रतिनिधित्व केले. २०१६ मध्ये पुन्हा आयर्लंडसाठी खेळताना २ कसोटी, ६८ वनडे आणि ३८ टी२० सामने खेळले.
आयर्लंडने २००७ क्रिकेट विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली होती. या विश्वचषकात आयर्लंडने पाकिस्तान व बांगलादेशला पराभूत केलेले. या विजयांमध्ये रँकिनचे मोठे योगदान होते. रँकिनने भारताविरुद्ध एक वनडे व ३ टी२० सामने खेळले. ज्यामध्ये तो एकही बळी मिळवू शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडमध्ये होणार आयपीएलचे आयोजन? बोर्डाने दिली ‘ही’ माहिती
‘तो’ स्कूप शॉट पाहून माजी भारतीय क्रिकेटपटूने म्हटले ‘तो यह भी बॉस है’